धाराशिव मध्ये पत्रकारावर हल्ला; पत्रकार संघटनांकडून निषेध…
धाराशिव मध्ये पत्रकारावर हल्ला; पत्रकार संघटनांकडून निषेध…
छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) – धाराशिव येथील प्रसिद्ध लेखक, कवी,पत्रकार रविंद्र केसकर यांच्यावर सोमवारी रात्री अज्ञातांनी सशस्त्र हल्ला करुन त्यांचे अपहरण केल्याची घटना आठ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेचा जिल्ह्यातील सर्व पत्रकार संघटनांनी तीव्र निषेध करत हल्लेखोरांना तात्काळ अटक करण्याची मागणी पोलीस प्रशासनाला केली आहे. धाराशिव जिल्हा पत्रकार संघाचे रविंद्र केसकर यांचे अपहरण करुन त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना सोमवारी रात्री आठ वाजता घडली.
रवींद्र केसकर हे दैनिक संचारचे जिल्हा प्रतिनिधी आहेत ते आपले कार्यालयीन काम आटोपून घरी जात असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्यांना धाराशिव येथील अमर पॅलेस ते साळुंके नगर बेंबळी रोड या भागात मारहाण केली. चाकू हल्ल्यात त्यांच्या चेहऱ्याला जखम झाली आहे. केसकर या हल्ल्यातून बालंबाल बचावले आहेत. त्यांची दुचाकी चोरून नेण्यात आली. ही दुचाकी तुळजापूर रोडवर वडगाव शिवारात एका पेट्रोल पंपाजवळ बेवारस अवस्थेत आढळून आली.
याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी त्यांच्या यंत्रणेला तातडीने तपास करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, हल्ल्याचा प्रयत्न का झाला, या मागचे सूत्रधार कोण आहेत, पत्रकारांना टार्गेट का केले जाते, असे प्रश्न निर्माण होत आहेत. या मुळे पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
या घटनेचा जिल्ह्यातील सर्वच पत्रकारांनी तीव्र निषेध केला असून पोलिसांनी घटनेची तक्रार नोंदवून घेतली आहे. तपास जलदगतीने व्हावा,यासाठी आज मंगळवारी दुपारी चार वाजता पोलिसांना सर्वच पत्रकारांच्या वतीने निवेदन देणार असल्याचे धाराशिव पत्रकार संघाचे अध्यक्ष चंद्रसेन देशमुख यांनी फेसबूक पोस्ट द्वारे सांगितले तसेच व्हॉईस ऑफ मीडियाने सुद्धा या हल्याचा तीव्र निषेध केला असून व्हॉईस ऑफ मीडिया तर्फे सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. अशी माहिती व्हॉईस ऑफ मीडियाचे हुंकार बनसोडे यांनी आमचे प्रतिनिधी प्रतिक भोसले यांच्याशी बोलताना दिली आहे.