
जळगाव हत्याकांड..पुर्व वैमनस्यातुन दोन सख्ख्या भावासह डॅान चा खुन
जळगाव : जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील
कंडारी येथे जुन्या वादातून दोघा सख्ख्या भावांची तलवार
आणि चाकूने भोसकून निर्घृण हत्या करण्यात आल्याची
धक्कादायक घटना शुक्रवारी (१ सप्टेंबर) रात्री १०वाजेच्या सुमारास घडली. शांताराम भोलानाथ साळुंखे(वय ३३) आणि राकेश भोलानाथ साळुंखे (वय २८) अशी मयतांची नावे आहेत. या गुन्ह्याचा तपास सुरू होत नाही, तोच मध्यरात्री दीडच्या सुमारास कुविख्यात गुन्हेगार निखील राजपूतचादेखील खून झाला. एकाच रात्री
एकामागून एक तब्बल तीन खून झाल्यामुळे जळगाव जिल्हा हादरला आहे. भुसावळ तालुक्यातील कंडारी गावातील शांताराम
साळुंखे आणि राकेश साळुंखे या भावंडांचा गावातील एका कुटुंबाशी जुना वाद आहे. त्या वादातून शुक्रवारी हल्लेखोरांनी भावंडांवर हल्ला चढवला. या हल्ल्यात तलवारीसह चाकूचा सपासप वापर करण्यात आल्याने शांताराम साळुंखे आणि राकेश साळुंखे या दोन्ही भावांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन जण जखमी झाले आहेत. त्यांना ट्रामा केअर सेंटरला हलवण्यात आले असून
त्यातील एकाची प्रकृती गंभीर आहे.
कंडारीतील दुहेरी खुनाची घटना समोर आल्यानंतर भुसावळ शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गजानन पडघण आणि बाजारपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. दोन्ही मृतदेह
शवविच्छेदनासाठी ट्रामा सेंटरमध्ये रवाना करण्यात आले. पोलिस तपासात आतापर्यंत संशयित म्हणून दीपक छगन तायडे आणि मनोज मोरे यांची नावे समोर आली असून त्यांचा शोध सुरू आहे.
दुहेरी हत्याकांडानंतर पुन्हा तिसरा खून दोन खुनाच्या घटनाना काही तास उलटत नाही तोच पोलिसांच्या रेकॉर्डवरील कुविख्यात गुन्हेगार म्हणून ख्याती असलेल्या निखील राजपूत याची हत्या झाली. भुसावळ शहरातील श्रीराम नगराजवळील पाण्याच्या
टाकीजवळ त्याचे वास्तव्य होते. शुक्रवारी रात्री निखील
राजपूत हा घरी आल्यानंतर काही संशयितांसोबत पाण्याच्या टाकीच्या टेरेसवर झोपला असता त्याचा वाद झाला आणि वादातून त्याच्या गळ्यावर चाकूचे सपासप वार करीत खून करण्यात आल्याची घटना समोर आलीआहे. या प्रकरणातील एका संशयिताचे नाव निष्पन्न झाले असून कौटुंबिक वादातून त्याने हा खून केल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे २४ तासांपूर्वीच निखीलसह त्याच्या सहकाऱ्यांनी बाजारपेठ पोलिसांवर
हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. खुनाची घटना समोर आल्यानंतर जळगावचे पोलिस उपअधीक्षक संदीप गावित, एलसीबीचे पोलिस निरीक्षक किसनराव नजन पाटील, भुसावळ शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गजानन पडघण व बाजारपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. एकाच
रात्रीतून तीन खुनाच्या घटनेने जळगाव जिल्ह्यात मोठी
खळबळ उडाली अन कायदा व व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे


