
चंद्रपूर: LCB ची मोठी कारवाई; ६५ गोवंश मुक्त, २७.८२ लाखांच्या मुद्देमालासह ३ तस्करांना अटक
चंद्रपूर:
जिल्ह्यात अवैध धंद्यांविरुद्ध आणि प्राण्यांच्या अमानुष तस्करीविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखा (LCB) चंद्रपूरने धडक मोहीम उघडली आहे. दिनांक ०६ सप्टेंबर २०२६ रोजी गुन्हे शाखेच्या पथकाने घुग्घुस पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिपरी फाटा (धानोरा – गडचांदूर रोड) परिसरात अत्यंत नियोजनबद्ध सापळा रचून ६५ गोवंशाची सुटका केली. या प्रकरणी पोलिसांनी २७ लाख ८२ हजार रुपयांचा मुद्दामाल जप्त करत ३ तस्करांना बेड्या ठोकल्या आहेत.

नाकाबंदीदरम्यान ट्रकमध्ये आढळला निर्दयीपणा
गुप्त माहितीच्या आधारे एलसीबीच्या पथकाने पिपरी फाटा परिसरात नाकाबंदी केली होती. संशयास्पद वाटणारा १४ चक्की अशोक लेलँड ट्रक थांबवून त्याची पाहणी केली असता, त्यात अत्यंत क्रूर आणि अमानुष पद्धतीने गोवंश कोंबल्याचे समोर आले. प्राण्यांसाठी चारा किंवा पाण्याची कोणतीही सोय न करता त्यांना दाटीवाटीने बांधण्यात आले होते. या भीषण परिस्थितीत गुदमरल्यामुळे २ जनावरांचा जागीच मृत्यू झाला होता, तर ६३ जनावरांचा जीव वाचवण्यात पोलिसांना यश आले.
जप्त करण्यात आलेल्या ६३ गोवंशांना तातडीने वैद्यकीय उपचार, चारा व संरक्षणासाठी पडोली येथील ‘प्यार फाउंडेशन’ गोशाळेत दाखल करण्यात आले आहे.

अटक व फरार आरोपींची नावे
अटक करण्यात आलेले आरोपी:
-
ओमप्रकाश मुरलीधर कावळे (वय ३८, रा. यशोधरा नगर, नागपूर – ट्रक चालक)

-
कलीम सईद मलीक (वय ३३, रा. कैलासपूर, उत्तर प्रदेश – मजूर)
-
शाहरूख मोहम्मद अयुब मलीक (वय ३०, रा. कैलासपूर, उत्तर प्रदेश – मजूर)

फरार आरोपी (तपास सुरू):
-
इरफान शेख (रा. गडचांदूर, जि. चंद्रपूर)
-
तौसिफ भाई निजाम अहमद (रा. नागपूर)
-
अरबाज कुरेशी (रा. नागपूर)
(तपासादरम्यान जप्त करण्यात आलेला ट्रक औरंगाबाद येथील रहिवासी जावेद पठाण माजिद पठाण याच्या मालकीचा असल्याचे निष्पन्न झाले आहे.)
जप्त केलेला मुद्देमाल (एकूण: ₹ २७,८२,०००/-)
| साहित्य / प्राणी | मूल्य (रुपयांत) |
| अशोक लेलँड १४ चक्की ट्रक | ₹ १५,००,०००/- |
| ६५ गोवंश जनावरे | ₹ १२,६०,०००/- |
| मोबाईल व इतर साहित्य | ₹ २२,०००/- |
कडक कलमांखाली गुन्हा दाखल
याप्रकरणी आरोपींविरुद्ध घुग्घुस पोलीस ठाण्यात प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम च्या विविध कडक कलमांसह नवीन भारतीय न्याय संहिता (BNS) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
ही यशस्वी कारवाई राजुरा/गडचांदूर उपविभाग आणि एलसीबी चंद्रपूरच्या संयुक्त पथकाने पार पाडली असून, पुढील सखोल तपास संबंधित पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत.




