
धक्कादायक! अनैतिक संबंधातून जन्मलेल्या नवजात स्त्री अर्भकाला गटारीत फेकले…
धक्कादायक! अनैतिक संबंधातून जन्मलेल्या नवजात स्त्री अर्भकाला गटारीत फेकले…
धाराशिव (प्रतिक भोसले)- धाराशिव जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एकीकडे ‘बेटी बचाव बेटी पढाओ’ चा नारा बुलंद केला जात असताना मुलगी झाली तेव्हाच तिला नकोशी केल्याची घटना घडली आहे. जन्म घेऊन फक्त सहा ते सात तास झालेल्या एका नवजात स्त्री अर्भकाला तिच्या अल्पवयीन मातेने बेवारस सोडले. पण अखेर निसर्गाच्या कृपेमुळे अर्भक पोलिसांपर्यंत पोचले अन् त्यांनी त्याच्या माता-पित्यांची (नाव गाव गोपनीय) माहिती घेऊन दोन तासांच्या आत त्यांना अटक केली.


जन्म घेवून सहा ते सात तास झालेले अर्भक बेंबळी (ता. धाराशिव) येथील जिल्हा परिषदेच्या पडक्या शाळेत सकाळी पडलेले आढळून आले आहे. सकाळी साडेनऊ वा.सु. शाळा उघडण्यास आलेले शिपाई शेखअली रोडे यांना हे अर्भक पडक्या शाळेत दिसून आले. ही बाब त्याने लागलीच गावातील काही लोकांना सांगितली. या आधी अर्भकाला गटारीत टाकले होते. यामुळे अर्भक गटारीच्या घाणीने माखलेले दिसत होते. नंतर त्याला उघड्यावर टाकण्यात आले. शाळेत हे अर्भक आढळून येताच गावातील नागरिकांनी लगेच प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. आणि पोलिसांना याची माहिती दिली. त्या नंतर काही वेळाने पोलिसही आरोग्य केंद्रात दाखल झाले. आरोग्य केंद्रात अर्भकाची स्वछता करण्यात आली. योग्य ती तपासणी करण्यात आली. आणि पुढील कारवाईसाठी त्यास रुग्णवाहिकेने धाराशिव येथे पाठविण्यात आले. विशेष म्हणजे अल्पवयीन अविवाहित मातेचे हे अर्भक असल्याचे पोलिस तपासात समोर आले. या प्रकरणी फिर्यादी – पोना. रविकांत मधुकर जगताप, (वय 36 वर्षे), नेमणूक पोलिस ठाणे बेंबळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भा.दं.सं.कलम 317 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, (दि.02 फेब्रुवारी) रोजी सकाळी 10.00 वा.सू. ग्रामपंचायत सदस्य नवाब पठाण यांनी पोलीस ठाण्यास माहीती दिली की, त्यांना जिल्हा परिषद उर्दू शाळेतील शिपाई शेखअली रोडे यांनी फोनवरुन सांगितले की, जिल्हा परिषद शाळेच्या पडीक असलेल्या इमारती मध्ये बाजारासाठी वापरण्यात येणाऱ्या एका पांढऱ्या रंगाच्या खताच्या पोत्याच्या पिशवीमध्ये एक लहान स्त्री जातीचे बाळ रडत आहे असे सांगितल्याने त्या ठिकाणी पोना. रविकांत जगताप यांनी जाऊन पाहिले असता पांढऱ्या रंगाच्या पोत्याच्या पिशवी मध्ये एक लहान बाळ रडत असल्याचे दिसले, जगताप यांनी लगेच ही माहिती वरिष्ठांना दिली आणि काही वेळातच सपोनि पाटील हे आपल्या स्टाफ सह तेथे आले.

सदर ठिकाणी जिल्हा परिषद उर्दू शाळेतील शिपाई शेखअली रोडे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते. पोलिसांनी मिळालेल्या माहीतीबाबतची खात्री करुन लागलीच प्राथमिक आरोग्य केंद्र बेंबळी येथील वैद्यकिय अधिकारी राठोड यांना माहीती दिली. वैद्यकिय अधिकारी हे त्यांच्या स्टाफसह घटनास्थळी येऊन त्यांनी अर्भकास तपासुन अधिक उपचार कामी प्राथमिक आरोग्य केंद्र बेंबळी येथे घेऊन गेले. प्राथमिक आरोग्य केंद्र बेंबळी येथे सदर अर्भकावर प्राथमिक उपचार करुन त्यास अधिक उपचाराची आवश्यकता असल्याने पुढील उपचार कामी सिव्हील हॉस्पिटल धाराशिव येथे रेफर केल्याने सदर अर्भकास प्राथमिक आरोग्य केंद्र बेंबळी येथील एक नर्स, पोलीस अंमलदार पोकॉ नरखेडकर यांच्यासह ॲम्बुलन्सने सिव्हील हॉस्पिटल धाराशिव येथे पाठविले. सदर अर्भकाचे वयाबाबत सपोनि पाटील यांनी वैद्यकिय अधिकारी यांच्याकडे खात्री केली असता त्यांनी सदरचे अर्भक हे अंदाजे 6 ते 7 तासापुर्वी जन्मलेले असावे असा अंदाज व्यक्त केला.
विशेष म्हणजे माहिती मिळताच पोलिसांनी दोन तासातच संबंधित घटनेतील व्यक्तींचा शोध लावला. त्यासाठी शाळेत लावलेल्या सीसीटीव्ही कमेऱ्यांची मदत घेण्यात आली. त्यानुसार एका कारमधून दोघांनी या अर्भकाला पिशवीत घालून शाळेच्या मैदानावर बेवारस टाकून दिल्याचे निष्पन्न झाले. अशी माहिती समोर येताच पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान करत त्या अल्पवयीन मातेसह आरोपीला ताब्यात घेतले. प्रेमप्रकरणातून अल्पवयीन बालिकेस दिवस गेले होते. दिवस पूर्ण झाल्यानंतर शुक्रवार (दि.२) रोजी पहाटे चार वाजता ती घरीच बाळंत झाली. अल्पवयीन आई आणि तिच्या वडिलांनी हे अर्भक शाळेच्या मैदानावर पहाटेच टाकले. असे पोलिस तपासात समोर आले आहे.


