
गुडलकच्या नावाखाली खंडणी मागणाऱ्या कथित पत्रकारावर गुन्हा दाखल
नवी मुंबई – जुगार खेळतात असा आरोप करून गुडलकच्या नावाखाली खंडणी मागणाऱ्यावर वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुठल्याही पोलीस अधिकाऱ्याकडे तक्रार केली तरी काहीही होणार नाही अशी धमकीही त्याने दिली होती. पत्रकार असल्याची बतावणी करुन अवैध धंद्याची बातमी न टाकण्यासाठी 50 हजार रुपये गुडलक / गुडविल व दरमहा 20 हजार रुपये मागणाऱ्या कथित पत्रकारावर वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कथित पत्रकारावर यापूर्वी देखील फसवणुकीचे गुन्हे दाखल असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. डीसीपी, एसीपी, सीपी कोणीही असो, माझ्यासमोर येण्याची पोलिसांची ताकद नाही अशी धमकी देऊन पैसे मागितले जात होते. याबाबत तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी रविवारी या कथित पत्रकारावर कारवाई केली आहे.
एकनाथ शिवराम अडसूळ (वय-47 रा. खारघर) असे गुन्हा दाखल केलेल्या कथित पत्रकाराचे नाव आहे. तो वाशी येथील एका व्यक्तीला खंडणीसाठी धमकी देत होता. या व्यक्तीच्या घरात जुगाराचा अड्डा चालू असल्याचा आरोप होता. त्यामुळे त्याच्या विरोधात बातमी न छापण्यासाठी तसेच पोलिसांकडे तक्रार न करण्यसाठी तो गुडविल / गुडलक स्वरुपात 50 हजार तर महिना 20 हजारांची मागणी करत होता. तडजोड करुन गुडविल / गुडलक 30 तर महिना 10 हजार रुपये देण्याचे तक्रारदार यांनी मान्य केले. दरम्यान, कथित पत्रकार एकनाथ अडसूळ याचे संभाषण तक्रारदार यांनी रेकॉर्ड करुन पोलिसांना देऊन त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी रविवारी सपाळा रचून त्याच्यावर कारवाई केली. पोलिसांनी कारवाई केल्यानंतर तक्रारदार आणि एकनाथ अडसूळ यांच्यातील संभाषणाचे रेकॉर्डिंग समोर आले आहे. यामध्ये अडसूळ हा संबंधित व्यक्तीवर त्याची छाप पाडण्यासाठी आपला पेपर लय डेंजर आहे. माझ्यासमोर यायची कोणाची ताकद नाही. डीसीपी, एसीपी, सीपी कोणीही असो सगळे माझ्या खिश्यात असे वक्तव्य करत असल्याचे समोर आले आहे. तसेच आपल्याला खंडणी दिल्यानंतर मांडवली झाली असं पोलिसांना सांगून पुन्हा धंदा सुरु करायचा असा सल्लाही तो देत असल्याचे दिसत आहे. त्याद्वारे तक्रारदार याचा खरचं अवैध धंदा होता का? याची चौकशी वाशी पोलीस करीत आहेत.


गुडलक / गुडविल म्हणजे काय?

गुन्हेगारी क्षेत्रात अनेक सांकेतिक शब्दांचा वापर केला जातो. त्यातील अनेक शब्दांचे अर्थ आता सर्वसामान्यांनाही कळत आहेत. पेटी म्हणजे लाख रुपये तर खोका म्हणजे एक कोटी हे सर्वांना ज्ञात झाले आहे. तसेच खंडणी मागताना गुडलक या शब्दाचा वापर केला जात असल्याचे अनेक गुन्ह्यात निदर्शनास आले आहे. या गुन्ह्यात आरोपीने खंडणी मागताना गुडलक / गुडविल या शब्दाचा उपयोग केला आहे.



