
व्यापाऱ्यावर दरोडा टाकणाऱ्या टोळीचा २४ तासांत पर्दाफाश; सात आरोपी जेरबंद, ३.१० लाखांचा मुद्देमाल जप्त
यवतमाळ | प्रतिनिधी
यवतमाळ जिल्ह्यातील वडगाव जंगल पोलीस ठाण्याच्या हद्दीत व्यापाऱ्यावर जीवघेणा हल्ला करून रोख रक्कम लुटणाऱ्या दरोडेखोर टोळीचा पोलिसांनी अवघ्या २४ तासांत पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात सात आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून रोख रक्कम, दुचाकी वाहने व इतर साहित्य असा एकूण ३ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

व्यापाऱ्यावर हल्ला करून ५५ हजारांची लूट
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ५ जून २०२६ रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास अकोला बाजार येथील व्यापारी सय्यद एजाज मुसा यांनी आपले किराणा दुकान बंद करून दुकानातील ५५ हजार रुपये रोख रक्कम घेऊन दोन कामगारांसह दुचाकीवरून घरी जात होते.
दरम्यान, बोरीसिंह शिवार परिसरात दोन दुचाकींवरून आलेल्या चार अज्ञात आरोपींनी व्यापाऱ्याचा पाठलाग केला. अंधाराचा फायदा घेत आरोपींनी व्यापाऱ्यावर हल्ला करून त्यांना जखमी केले आणि दुचाकीच्या डिकीत ठेवलेली ५५ हजार रुपयांची रोख रक्कम जबरदस्तीने लुटून पळ काढला.

या घटनेनंतर जखमी व्यापाऱ्याच्या कामगाराच्या तक्रारीवरून वडगाव जंगल पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १८६/२०२६ दाखल करण्यात आला.
पोलिसांची वेगवान तपास मोहीम
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार अनेक विशेष पथके तयार करण्यात आली. तांत्रिक विश्लेषण, गुप्त माहिती आणि स्थानिक माहितीदारांच्या मदतीने पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला.

तपासादरम्यान प्रथम एका संशयिताला ताब्यात घेऊन कसून चौकशी करण्यात आली. चौकशीत त्याने आपल्या इतर साथीदारांसह दरोडा टाकल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी वेगाने कारवाई करत उर्वरित आरोपींनाही अटक केली.
सात आरोपी अटकेत
या प्रकरणात पोलिसांनी एकूण सात आरोपींना अटक केली आहे. आरोपींनी पैशाच्या लोभातून हा गुन्हा केल्याची माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे.

३.१० लाखांचा मुद्देमाल हस्तगत
आरोपींकडून गुन्ह्यातील रोख रक्कम, गुन्हा करण्यासाठी वापरलेली दुचाकी वाहने आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत ३ लाख १० हजार रुपये इतकी आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी कारवाई
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच स्थानिक गुन्हे शाखा आणि वडगाव जंगल पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने केली. पोलिसांच्या तत्पर तपासामुळे गंभीर स्वरूपाच्या दरोडा प्रकरणाचा अल्पावधीत उलगडा करण्यात यश आले.
पोलीसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, मोठ्या प्रमाणात रोख रक्कम वाहून नेताना आवश्यक खबरदारी घ्यावी तसेच कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी.




