
दुकान फोडून लाखांचे स्क्रॅप पळवणारी टोळी कळमना पोलिसांच्या जाळ्यात

कळमना पोलिसांची मोठी कामगिरी: दुकान फोडून चोरी करणाऱ्या ३ आरोपींना अटक, ४ लाख ४४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
नागपूर:
कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुकान फोडून रोख रक्कम आणि लाखांचे तांबे-पितळेचे स्क्रॅप चोरणाऱ्या तीन सराईत चोरट्यांना कळमना पोलिसांनी गजाआड केले आहे. पोलिसांनी आरोपींकडून चोरीचा माल आणि गुन्ह्यात वापरलेले वाहन असा एकूण ४,४४,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.


घटना नेमकी काय?
फिर्यादी विवेक शंकर शाहू (वय २७ वर्षे, रा. प्लॉट नं. सि/२, पावनगांव रोड, नर्मदा नगर, कळमना) यांचे ‘तिरुपती मेटल्स स्क्रॅप’ नावाचे दुकान आहे. १३ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री १०.०० वाजेपासून ते १४ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजे दरम्यान, फिर्यादी आपले दुकान बंद करून घरी गेलेले असताना, अज्ञात चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला. चोरट्यांनी दुकानाच्या काऊंटरमधील रोख १०,००० रुपये आणि वजनी १४० किलो तांबे-पितळेचे स्क्रॅप असा एकूण १,६४,००० रुपयांचा मुद्देमाल लांबवला. या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून कळमना पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तांत्रिक तपासातून आरोपी जेरबंद
गुन्ह्याचा तपास करत असताना कळमना पोलीस ठाण्याच्या पथकातील अधिकारी व अंमलदारांनी तांत्रिक तपास केला. मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून आरोपी हे वरोरा, जि. चंद्रपूर येथील असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून खालील तीन आरोपींना ताब्यात घेतले:

१. व्यंकटेश हरी बदखल (वय ३१ वर्षे)
२. मनोहर नारायण दांडेकर (वय ३८ वर्षे)

३. भिमा रामदास दांडेकर (वय ४२ वर्षे) (सर्व रा. हनुमान वार्ड, पंकज टॉकीज जवळ, यात्रा वार्ड, वरोरा, जि. चंद्रपूर)
पोलिसांनी कसून चौकशी केली असता, त्यांनी संगनमताने ही चोरी केल्याची कबुली दिली.

जप्त करण्यात आलेला मुद्देमाल
आरोपींच्या ताब्यातून गुन्ह्यातील चोरीचा माल (तांबे-पितळेचे स्क्रॅप) तसेच गुन्ह्यात वापरलेले टाटा पिकअप वाहन (क्र. एम.एच. ४० सी.टी. १९३२) असा एकूण ४,४४,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.
अधिकारी व कर्मचाऱ्यांची कामगिरी
वरील यशस्वी कामगिरी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली:
-
मार्गदर्शन: वसंत परदेशी (अपपर पोलीस आयुक्त, दक्षिण विभाग), श्री. नित्यानंद झा (पोलीस उप आयुक्त, परि. क्र. ५), रोहित ओव्हाळ (सहा. पोलीस आयुक्त, कळमना विभाग).
-
तपास पथक: वपोनि. प्रविण काळे, पोनि. करीम पठाण, सपोनि. अजय जाधव, पोहवा. रविकुमार शाहू, प्रदीप कुमार, पोअं. मंगेश लोही, संतोष पांडे, अनिल जाधव, प्रफुल्ल गोहोकार व प्रविण ईनवाते.



