आनंदवार्ता! ४४० सहाय्यक पोलिस निरीक्षकांना मिळणार पदोन्नती…
आनंदवार्ता! ४४० सहाय्यक पोलिस निरीक्षकांना मिळणार पदोन्नती…
मुंबई (प्रतिनिधी) – सहायक पोलिस निरीक्षकांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. राज्य पोलिस दलातील १०३ क्रमांकाच्या तुकडीतील ४४० सहायक पोलिस निरीक्षकांना पदोन्नती देण्यात येणार आहे. यासाठी पोलिस महासंचालक कार्यालयातून महसूल संवर्गाची यादी प्रकाशित करण्यात आली आहे.
पोलिस महासंचालक कार्यालय आणि गृहमंत्रालयात योग्य समन्वयाच्या अभावाने गेल्या अडीच वर्षांपासून पदोन्नतीच्या कक्षेत असूनही सहायक पोलिस अधिकाऱ्यांना पदोन्नतीपासून वंचित ठेवण्यात आले. मात्र, आता पोलिस अधिकाऱ्यांनी न्यायालयाचे दार ठोठावल्यामुळे त्यांना पदोन्नती देण्याची तयारी करण्यात आली आहे.
राज्य पोलिस अधिकाऱ्याकडून दलातील १०३ क्रमांकाच्या तुकडीतील सहायक पोलिस निरीक्षक गेल्या अडीच वर्षांपासून पदोन्नतीच्या प्रतीक्षेत होते. मात्र, गृहमंत्रालय आणि पोलिस महासंचालक कार्यालयाने पदोन्नतीच्या विषयाला गांभीर्याने घेतले नव्हते. त्याचा फटका तब्बल ६०० सहायक पोलिस निरीक्षकांना बसला होता. १०३ क्रमांकाच्या तुकडीतील ४४० सहायक पोलिस निरीक्षकांना पदोन्नतीसाठी पोलिस महासंचालक कार्यालयातून मंगळवारी सायंकाळी महसूल संवर्गाची यादी प्रकाशित करण्यात आली. तसेच २५ एप्रिलपर्यंत बंधपत्र भरून सादर करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. निवडणूक काळातील निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या रिक्त जागांची स्थिती लक्षात घेता महासंचालक कार्यालय लवकरात लवकर पदोन्नती देण्याच्या विचारात आहे. त्यामुळे बंधपत्र आणि महसूल संवर्गाचा विषय दोन आठवड्यातच मार्गी लावणार आहेत. येत्या १५ दिवसांत निवडसूचीत नावे असलेल्या सहायक पोलिस निरीक्षकांना संवर्ग स्वीकारल्यानंतर अंतिम यादी लवकरच लावण्यात येणार आहे. येत्या मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात पोलिस निरीक्षक पदावर पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे.
४४० अधिकारी होणार पोलिस निरीक्षक
राज्य पोलिस दलातील १०३ तुकडीतील ४४० सहायक पोलिस निरीक्षकांना पोलिस निरीक्षक पदावर पदोन्नती देण्यात येणार आहे. पोलिस दलातील सेवानिवृत्ती आणि पदोन्नतीमुळे पोलिस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांची वाणवा होती. मात्र, आता चारशेहून अधिक पोलिस निरीक्षकांची भर पडणार आहे.