
धाराशिव जिल्ह्यातील प्रकरण; किरकोळ कारणासाठी रखडलेले फौजदारी खटले शीघ्रगतीने चालवा – खंडपीठाचे निर्देश
धाराशिव जिल्ह्यातील प्रकरण; किरकोळ कारणासाठी रखडलेले फौजदारी खटले शीघ्रगतीने चालवा – खंडपीठाचे निर्देश
छत्रपती संभाजीनगर – गुन्ह्यातील मुद्देमाल न्यायालयात सादर करण्यासारख्या कारणास्तव फौजदारी खटले रेंगाळू देऊ नयेत. असे फौजदारी खटले शीघ्र गतीने चालवण्यात यावेत. या संदर्भाने अभियोग संचालनालयाच्या संचालकांनी परिपत्रक प्रसिद्ध करावेत, असे निर्देश औरंगाबाद खंडपीठाचे न्या.एस.जी. मेहरे यांनी दिले आहेत.


मुद्देमाल न्यायालयात हजर न केल्यास न्यायालयानेही मुद्देमालाशी संबंधित नसलेले साक्षीदार तपासावेत. पोलीस आयुक्त व पोलीस अधीक्षक यांनी गुन्ह्यातील मुद्देमाल व रासायनिक विश्लेषण अहवाल विनाविलंब न्यायालयात हजर करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच महाराष्ट्र व गोवा वकील परिषदेनेसुद्धा याबाबत पावले उचलावीत, असे आदेशात म्हटले आहे. धाराशिव जिल्ह्यातील वाशी पोलीस ठाण्यात आरोपी निखिल उर्फ आतिष रामदास हाके याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात तपासाअंती पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केले असून आरोपीविरुद्ध भूम येथील सत्र न्यायालयात फौजदारी खटला प्रलंबित आहे. या खटल्यात आरोपी कच्चा कैदी असून दोषारोप निश्चितीनंतर कोणताही साक्षीदार सरकार पक्षातर्फे तपासण्यात आला नाही. दोषारोप निश्चितीनंतर न्यायालयात मुद्देमाल जमा करण्यासाठी फौजदारी खटला प्रलंबित आहे. कच्च्या कैद्याला अनंत काळासाठी तुरुंगात ठेवणे बेकायदेशीर व घटनाबाह्य आहे. आरोपीने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जामीन अर्ज दाखल केला होता. या प्रकरणी खंडपीठाने वरीलप्रमाणे निर्देश दिले आहेत. आरोपीतर्फे ॲड. सुदर्शन साळुंके आणि सरकारच्या वतीने ॲड. एस.पी. तिवारी यांनी बाजू मांडली.



