
प्रियकराचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार अन् आईला ४० वर्षे तुरूंगवासाची शिक्षा
प्रियकराचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार अन् आईला ४० वर्षे तुरूंगवासाची शिक्षा
केरळ : प्रियकराला सात वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करु दिल्याच्या आरोपात एका महिलेला ४० वर्षांच्या तुरुंगावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसंच तिला २० हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. या महिलेच्या प्रियकराने महिलेच्या मुलीवर बलात्कार केला आणि तिचं लैंगिक शोषण केलं. या सगळ्याला आईची संमती होती. याच आरोपावरुन या प्रकरणात पॉक्सो अंतर्गत आईवर कारवाई करण्यात आली आहे. न्यायालयाने महिलेला ४० वर्षांचा तुरूंगवास, २० हजार रूपयाचा दंड आणि ६ महिने सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. तिरुवनंतपूरम येथील जलदगती न्यायालायने या प्रकरणाची सुनावणी करताना, या क्रूर मातेने मातृत्वाला काळीमा फासला असल्याचे स्पष्ट करत तिच्यावर कोणतीही दयामया न दाखवता कठोरात कठोर शिक्षा देणेच योग्य असल्याचे मत नोंदवले आहे.


केरळ येथील फास्ट ट्रॅक कोर्टाने (जलदगती न्यायालयाने) सोमवार (दि.२७) रोजी हा निर्णय दिला आहे. तिरुवनंतपुरम येथील फास्ट ट्रॅक न्यायालयाच्या न्यायाधीश आर रेखा यांनी मार्च २०१८ ते सप्टेंबर २०१९ पर्यंत घडलेल्या घटनेप्रकरणी पीडित मुलीच्या आईला ४० वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. न्यायाधीश रेखा म्हणाल्या, या प्रकरणात शिक्षा आईलाच सुनावण्यात आली आहे कारण खटला सुरु असताना मुख्य आरोपीने म्हणजेच या महिलेच्या प्रियकराने आत्महत्या केली. या महिलेला शिक्षा ठोठावत असताना रेखा म्हणाल्या पीडित मुलीचं लहानपण तिच्या आईमुळे कुस्करलं गेलं. आपल्या लहान मुलीचं रक्षण करण्याची जबाबदारी तिच्या आईची होती. मात्र या आईने प्रियकराला सात वर्षांच्या मुलीवर बलात्काराची संमती दिली. त्यामुळे पीडित मुलगी लैंगिक शोषण आणि बलात्कार पीडिता झाली.

या महिलेचा पती मानसिकदृष्ट्या स्थिर नव्हता. त्यामुळे ही महिला तिच्या पतीसह राहात नव्हती. त्यानंतर या महिलेचे संबंध शिशुपालन नावाच्या व्यक्तीशी आले. यानेच या महिलेच्या मुलीवर बलात्कार केला. शिशुपालनने तिच्यावर २०१८ ते २०१९ या कालावधीत अनेकदा बलात्कार केला आणि तिचं लैंगिक शोषण केलं. असं इंडिया टुडेने हे वृत्त दिलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या पीडितेच्या ११ वर्षांच्या सावत्र बहिणीचंही शोषण झालं आहे. पीडितेला आणि तिच्या ११ वर्षांच्या बहिणीला शांत राहण्यासाठी धमकवण्यात आलं होतं. या दोन्ही मुली आजीच्या घरी कशातरी पळून आल्या ज्यानंतर हा प्रकार उघड झाला. या प्रकरणात ३२ प्रकारची कागदपत्रं सादर केली गेली आहेत. तर २२ जणांच्या साक्षी नोंदवल्या गेल्या आहेत.


