
कौतुकास्पद! गरिबांची दिवाळी धाराशिव पोलिसांनी केली गोड
कौतुकास्पद! गरिबांची दिवाळी धाराशिव पोलिसांनी केली गोड
धाराशिव | प्रतिक भोसले – सर्वत्र मोठ्या जल्लोषात दिवाळी साजरी केली जात आहे. पोलीस सुद्धा नागरिकांच्या सुरक्षेसाठी आपल्या कर्तव्यावर आहेत. माञ वेळात वेळ काढून माणुसकी जपत धाराशिव पोलिसांनी गरजू – गोरगरिब कुटुंबांना फराळ आणि भेटवस्तू देऊन एक अनोखी दिवाळी साजरी केली आहे.


जिल्हा पोलीस दलातर्फे नागरिकांमध्ये पोलीस प्रशासना प्रती विश्वास, आपुलकीची भावना निर्माण व्हावी, गरजू – गोरगरिबांची दिवाळी आनंदात साजरी व्हावी, सर्वजण नवीन कपड्यांची खरेदी करतात आणि आनंदाने सण साजरा करतात परंतु गरजु – गोरगरिबांना हा आनंद घेता येत नाही. तेव्हा गोरगरिबांची दिवाळी देखील गोड करण्याच्या उद्देशाने पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि श्रीमती महिमा कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून ‘एक हात मदतीचा गरजवंतासाठी’ या विशेष उपक्रमांतर्गत दि.11 नोव्हेंबर रोजी पोलीस मुख्यालयातील गार्डन लॉनवर दिवाळी साजरी करण्यात आली.

दिवाळी हा भारतातील सर्वात मोठा सण आहे या सणाचा आनंद अनेक गोरगरिब कुटुंबातील लोकांना मिळत नाही म्हणून त्यांना या सणाच्या आनंदात सहभागी करुन घेण्यासाठी या उपक्रमात गरजू – गोरगरीब कुटुंबाला फराळाचे साहित्य, मुलांसाठी कपडे, शैक्षणिक साहित्य तसेच जीवनावश्यक वस्तू या पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि श्रीमती महिमा कुलकर्णी यांच्या हस्ते जवळपास 500 गरजु – गोरगरिब कुटुंबातील लोकांना भेट स्वरुपात वाटप करण्यात आल्या. तसेच दि.12 नोव्हेंबर रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयातील जवळपास 40 अंशकालीन कर्मचाऱ्यांना सुद्धा फराळाचे साहित्य आणि जीवनावश्यक वस्तूंचे भेट स्वरुपात वाटप करण्यात आले.

या वेळी उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील राठोड, पोलीस ठाणे धाराशिवचे पोलीस निरीक्षक उस्मान शेख, राखीव पोलीस निरीक्षक अरविंद दुबे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सिध्देश्वर गोरे, यांच्या सह पोलीस अधिक्षक कार्यालयातील पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार आणि 40 अंशकालीन कर्मचारी आदी उपस्थित होते.


