
लग्नात आयफोन – दागिन्यांची चोरी करणारा चोरटा तीन तासातच गजाआड; वऱ्हाडी मंडळींनी पोलिसांचे मानले आभार
लग्नात आयफोन – दागिन्यांची चोरी करणारा चोरटा तीन तासातच गजाआड; वऱ्हाडी मंडळींनी पोलिसांचे मानले आभार
जळगाव – विवाह सोहळ्यातून आयफोन मोबाईलसह सोन्याच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्या एका चोरट्यास फुटेज आणि तांत्रीक माहितीच्या आधारावर पकडण्यात चाळीसगाव पोलिसांना यश मिळाले आहे. विशेष म्हणजे माहिती मिळताच 03 तासांपेक्षा कमी कालावधीत गुन्हा उघडकीस आणल्यामुळे पोलिसांच्या कामाचे वधू -वराकडील नातेवाईकांनी कौतुक करून आभार मानले.


चाळीसगाव शहर पोस्टे हद्दीत दि.7 डिसेंबर रोजी रात्री 09:30 वा.च्या सुमारास शहरातील हॉटेल कलमशांती पॅलेस या ठिकाणी गुन्ह्यातील फिर्यादी श्रीमती सरोज मुंकुद देशपांडे यांच्या मुलीचा लग्न समारंभ आयोजीत करण्यात आला होता. यातील फिर्यादी यांच्याकडे नवरीचे सोन्याचे दागिने, रोख रुपये व ॲपल कंपनीचा आयफोन 13 हा मोबाईल असा मुद्देमाल त्यांनी त्यांच्या पर्स मध्ये ठेवलेला होता व ती पर्स सोबत घेवून त्या लग्न ठिकाणी नातेवाईकांना भेटी गाठी घेत असतांना त्यांच्याकडुन दागीने ठेवलेली पर्स एका टेबलावर ठेवली गेली. त्यानंतर फिर्यादी ह्या नातेवाईकांना भेटुन सदर पर्स घेण्यास गेली असता पर्स त्या ठिकाणी मिळुन आली नाही, म्हणुन त्यांची खात्री झाली की कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांची सोन्याचे दागिने, रोख रुपये व मोबाईल ठेवलेली पर्स चोरुन नेली आहे. त्या नंतर त्यांनी लगेच चाळीसगांव शहर पोलिस स्टेशन गाठून गुरनं. 556/2023 भादंवि कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल केला.

सदरचा गंभीर स्वरुपाचा गुन्हा घडल्यानंतर एम.राजकुमार पोलिस अधिक्षक जळगाव यांच्या आदेशान्वये रमेश चोपडे अपर पोलिस अधिक्षक चाळीसगाव परिमंडळ तसेच अभयसिंह देशमुख सहा. पोलिस अधिक्षक उप विभाग चाळीसगांव व पोलिस निरीक्षक संदीप पाटील, पोउनि योगेश माळी, पोना/दिपक पाटील, पोकॉ/नंदु महाजन, पोकॉ/ अजय पाटील, पोहेकॉ राहुल सोनवणे, पोकॉ/विनोद खैरनार, पोकॉ/ रविंद्र बच्छे, पोकॉ/आशुतोष सोनवणे, पोहेकॉ/ नितीन वाल्हे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देवुन फिर्यादी व साक्षीदार यांना सविस्तर विचारपुस करुन तसेच घटनास्थळी आलेल्या आरोपीचा शोध घेण्यासाठी हॉटेलमधील व रोडवरील असलेल्या इतर हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज चेक करुन तसेच धुळे-कन्नड बायपास रोडवरील हॉटेल चालक यांना चोरी करणाऱ्या इसमाचे फुटेज दाखवुन व इतर तांत्रीक माहीतीच्या आधारे सदर गुन्ह्यातील आरोपीतास बायपास रोडवरील कोदगाव चौफुली जवळ मुद्देमालासह अटक करुन सदरचा गुन्हा उघडकीस आणलेला आहे.

सीसीटीव्ही फुटेज व फिर्यादी यांनी सांगितलेली सविस्तर हकीकत व मिळालेल्या गोपनीय माहीतीवरुन सदर गुन्ह्यामध्ये आरोपी नामे बालवीर माखन सिसोदीया (वय 19 वर्षे) रा.गुलखेडी, ता.पचोर, जि.राजगड (मध्यप्रदेश) याचा चाळीसगाव शहर परिसरात शोध घेता तो मिळून आल्यावर त्यास गुन्ह्यमध्ये ताब्यात घेवुन अटक करण्यात आलेली आहे. त्याच्याकडुन चोरीस गेलेल्या 6,85,000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. सदरचा गुन्हा पोलिसांनी खबर प्राप्त होताच 03 तासांपेक्षा कमी कालावधीत उघडकीस आणल्यामुळे पोलिसांच्या कामाचे वधू व वराकडील नातेवाईकांनी कौतुक करून आभार मानले.


