लातुर पोलिस अधिक्षकांच्या आदेशाने उदगीर येथील टोळीस लातुरसह ५ जिल्ह्यातून केले हद्दपार…
लातुर: जिल्ह्यातील भाईगिरी व गुंडगिरी मोडीत काढण्यासाठी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी जनसामान्यांना त्रास देऊन वेठीस धरणाऱ्या, नागरिकांच्या जीविताला व त्यांच्या मालमत्तेस धोका निर्माण करणाऱ्या असामाजिक तत्त्वांचा बीमोड करण्यासाठी पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी आज पावतो हद्दपारच्या एकूण तीन प्रकरणात 10 सराईत व कुख्यात आरोपी विरुद्ध कार्यवाही करत त्यांना लातूरसह पाच जिल्ह्यातून हद्दपार केले आहे.
याबाबत याबाबत थोडक्यात माहिती अशी की, उदगीर शहर व ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत वारंवार गुन्हे करणाऱ्या व टोळीने राहणाऱ्या सराईत गुन्हेगारांविरुद्ध हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. जिल्ह्यात शांतता अबाधित राहावी, सराईत गुन्हेगाराकडून कोणत्याही प्रकारचे गैरकायदेशीर कृत्य घडू नये. याकरिता उदगीर शहर व उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत वारंवार गंभीर स्वरूपाचे गुन्हे करून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या टोळी मधील गुन्हेगारांना एक वर्षासाठी लातूर, बीड, नांदेड ,परभणी व धाराशिव या पाच जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.
सदर गुन्हेगारांच्या टोळीचे अभिलेख पाहता पोलिस ठाणे उदगीर शहर व ग्रामीण येथे 11 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून सदर टोळी विरुद्ध खुनाचा प्रयत्न करणे, चोरी करताना दुखापत करणे, हल्ला करणे, अतिक्रमण करणे, धमक्या देणे तसेच बेकायदेशीर जमाव जमविणे, शांतता भंग करण्याच्या उद्देशाने कारवाया करणे, करणे, घातक शस्त्राने जबर दुखापत करणे, आजन्म कारावास किंवा अन्य कारावासाच्या शिक्षेस पात्र असलेले गुन्हे करणे, तसेच शरीराविरुद्ध, मालाविरुद्ध चे गुन्हे करणे इत्यादी प्रकारचे एकूण 11 गुन्हे पोलीस ठाणे उदगीर शहर व उदगीर ग्रामीण येथे दाखल असून त्यांचेवर अनेक वेळा प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात आली. परंतु त्यांच्या वर्तनात कोणत्याही प्रकारची सुधारणा न होता ते अधिकच उग्र होत असल्याने सदर टोळी कडून एखादा गंभीर दखलपात्र गुन्हा घडून जनतेच्या मालमत्तेस किंवा धोका इजा होऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता असल्याने टोळीप्रमुख
1) बाबर मोहम्मद सय्यद, वय 28 वर्ष, राहणार पेठदरवाजा, उदगीर.
2) अरबाज अजीमुद्दीन सय्यद, वय 23 वर्ष,राहणार धनगरबावडी जवळ, उदगीर.
3) सुलतान खुर्शीद शेख, वय 26 वर्ष, राहणार बनशेळकी रोड, उदगीर.
त्यांचे विरुद्ध महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 चे कलम 55 प्रमाणे कार्यवाही करून दिनांक 05/10/2023 रोजी पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी हद्दपारिचे आदेश पारित करून नमूद तारखेपासून सदरच्या सराईत गुन्हेगारांना लातूर, नांदेड, बीड ,परभणी व धाराशिव या पाच जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहेत.
तसेच सदरच्या टोळीतील इतर सदस्य नामे
1) मोसिन मतीन शेख, वय 23 वर्ष, राहणार मुसा नगर, उदगीर.
2)एजाज फारूक शेख, वय 23 वर्ष, राहणार मुसा नगर, उदगीर.
3) सोहेल फकीरमिया सय्यद, वय 23 वर्ष, राहणार मुसा नगर, उदगीर.
4) साबेर मंजूर पठाण, वय 26 वर्ष, राहणार पेठ दरवाजा, उदगीर.
यांचे विरुद्ध मागील एक/ दोन वर्षात उदगीर शहर व उदगीर ग्रामीण येथे गुन्हा दाखल नसल्याने त्यांची वर्तणूक सुधारण्यासाठी, मानवीय दृष्टिकोनातून एक संधी म्हणून त्यांना वर नमूद पाच जिल्ह्यातून हद्दपार न करता त्यांच्याकडून प्रतिष्ठित जामीनदारासह चांगल्या वर्तणुकीचे हमीपत्र घेण्यात आले आहे. हद्दपार केलेल्या नमूद गुन्हेगारांना उदगीर शहर पोलिसांनी हद्दपार क्षेत्राचे बाहेर नेऊन सोडण्याची कार्यवाही सुरू केली आहे.
सदरचा प्रस्ताव तयार करणे कामी उपविभागीय पोलिस अधिकारी, (उदगीर) दिलीप भागवत, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले, पोलिस अंमलदार प्रदीप स्वामी, पोलिस ठाणे उदगीर शहर चे पोलिस निरीक्षक परमेश्वर कदम, व त्यांच्या नेतृत्वातील टीम मधील पोलिस अमलदार बबन टारपे, गजानन पुल्लेवाड, सतीश पवार, साठे यांनी परिश्रम घेतले आहे.
सदर कारवाईच्या माध्यमातून गुन्हेगारी कृत्य करणाऱ्या सराईत गुन्हेगार,उपद्रवी लोकांवर जरब बसून सराईत गुन्हेगारांची टोळी जिल्ह्यातून हद्दपार केल्यामुळे इतर गुन्हेगारी कृत्य करणाऱ्यां गुन्हेगारांना चांगलाच दणका बसला आहे.