ऑर्डनन्स फॅक्टरीत नोकरीचे आमिष: १२ लाखांची फसवणूक करणारा मास्टरमाइंड दीड वर्षानंतर जेरबंद

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow


ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये नोकरीचे आमिष दाखवून १२ लाखांची फसवणूक करणारा मास्टरमाइंड जेरबंद; दीड वर्षापासून होता फरार

पुलगाव

ऑर्डनन्स फॅक्टरी, अंबाझरी (नागपूर) येथे नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून तब्बल १२ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या सराईत आरोपीला पुलगाव पोलिसांनी दीड वर्षानंतर बेड्या ठोकल्या आहेत. राजीव हिरास्वामी रेड्डी (रा. मानकापूर, नागपूर) असे अटक करण्यात आलेल्या मुख्य आरोपीचे नाव असून, तो मागील दीड वर्षापासून पोलिसांना गुंगारा देऊन फरार होता.





गुन्ह्याची पार्श्वभूमी:

मे २०२५ मध्ये पुलगाव पोलीस ठाण्यात अकील गाडगे (रा. कवठा झोपडी) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. आरोपी राजीव रेड्डी आणि त्याच्या साथीदारांनी फिर्यादी अकील गाडगे यांना ऑर्डनन्स फॅक्टरी अंबाझरी येथे नोकरीला लावून देण्याचे खोटे आश्वासन दिले होते. या नावाखाली त्यांच्याकडून तब्बल १२ लाख उकळण्यात आले. मात्र, बरीच प्रतीक्षा करूनही नोकरी किंवा पैसे परत न मिळाल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर पीडित तरुणाने पोलिसात धाव घेतली होती. या तक्रारीवरून मे २०२५ मध्ये पुलगाव पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.



‘नॅटग्रिड’ (NATGRID) च्या मदतीने लावला शोध:

गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी राजीव रेड्डी हा सातत्याने आपली ओळख व ठिकाण बदलून लपत फिरत होता. पोलीस त्याचा कसून शोध घेत होते. दरम्यान, पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलीस अधिकारी वंदना करखेले आणि ठाणेदार सदाशिव ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पुलगाव पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला.



पोलीस उपनिरीक्षक शहाजी घोडके, पोलीस अंमलदार अमोल आडे, सिद्धू सोमकुवर आणि मयुरी झोपाटे यांच्या पथकाने NATGRID (National Intelligence Grid) वरून मिळालेल्या तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून, २९ ऑक्टोबर २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास नागपुरातून या फरार आरोपीला शिताफीने अटक केली.

अनेक जणांची फसवणूक केल्याची शक्यता:

प्राथमिक तपासात समोर आले आहे की, हा आरोपी अत्यंत सराईत असून त्याने मागील ८ वर्षांत इतर आरोपींच्या मदतीने नोकरीचे आमिष दाखवून अनेक सुशिक्षित बेरोजगार युवकांची लाखो रुपयांची फसवणूक केली आहे. त्याच्यावर विविध ठिकाणी अशाच प्रकारचे गुन्हे दाखल असून बऱ्याच प्रकरणांमध्ये तो वॉण्टेड (फरार) होता. या कारवाईमुळे इतरही गुन्ह्यांचा पर्दाफाश होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील कसून तपास सुरू आहे.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!