
धाराशिव पोलिसांनी चोरी गेलेला लाखोंचा मुद्देमाल मूळ मालकांना दिला
धाराशिव पोलिसांनी चोरी गेलेला लाखोंचा मुद्देमाल मूळ मालकांना दिला
धाराशिव (प्रतिनिधी) – जिल्ह्यात विविध पोलीस ठाणे हद्दीत घरफोडी, चोरी, फसवणुकीत गेलेले सोने, चांदीचे दागिने, रोख रक्कम, वाहन असा एकूण जवळपास 24 लाखांचा जप्त केलेला मुद्देमाल मुळ मालकांना – फिर्यादींना परत मिळवून देण्यात धाराशिव पोलिसांना यश आले आहे. जिल्हा पोलिस मुख्यालय येथील सभागृहात आज पोलिसांनी जबरी चोरी, घरफोडी, फसवणूक, रोख रक्कम, वाहन चोरी या गुन्ह्यातील जप्त केलेल्या मुद्देमालाचे मूळ मालक यांना ‘हस्तांतरण कार्यक्रम’ आयोजित केला होता, या वेळी हा मुद्देमाल मूळ मालकांना देण्यात आला.


गेल्या एक वर्षापासुन धाराशिव जिल्हा पोलिसांनी वाशी पो.ठा.च्या 1, उस्मानाबाद ग्रामीण 1, कळंब 3, तुळजापूर 3, नळदुर्ग 1, तामलवाडी 1, बेंबळी 1,आनंदनगर 2, लोहारा 1, मुरुम 1 अशा 19 गुन्ह्यातील जप्त केलेल्या 17 मोटारसायकल, 02 ट्रॅक्टर, 02 मोबाईल फोन, व 45.89 ग्रॅम सुवर्ण दागिणे असा एकुण 23,99,889 ₹ किंमतीचा मुद्देमाल हा आज दि.01 डिसेंबर रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयातील सभागृह येथे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते मुळ मालकांना- फिर्यादींना परत करण्यात आला. आपले चोरीला गेलेला मौल्यवान एैवज- मुद्देमाल परत मिळवून दिल्याबद्दल फिर्यादींनी – मालमत्ता धारकांनी पोलीसांचे आभार व्यक्त केले.

या वेळी या कार्यक्रमास पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक गोहर हसन, पोलीस उपअधीक्षक सदाशिव शेलार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे, सपोनि शैलेश पवार, पोलीस ठाण्यातील अधिकारी व अंमलदार तसेच मुळ मालक उपस्थित होते.



