
परंडा पोलिसांनी कत्तलीसाठी वाहतूक करणाऱ्या गोवंशीय जनावरांची केली सुटका…
परंडा पोलिसांनी कत्तलीसाठी वाहतूक करणाऱ्या गोवंशीय जनावरांची केली सुटका…
धाराशिव (प्रतिक भोसले) – कुंभेजा फाटा येथे सोनारी कडून परंडा कडे विना परवाना बेकायदेशीररित्या खूप दाटीवाटीत, त्रासदायक पद्धतीत जनावरे घेऊन जाणाऱ्या वाहनचालकाला अटक करून चार देशी जातीच्या गाई तर दोन जर्सी जातीच्या गाई असा एकुण 6लाख 80 हजार रु. किंमतीच्या 6 गाई सह पिकअप वाहन जप्त करून परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदणी क्र. 02/2024 प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम 1960 चे कलम 11(1)(अ)(डी), महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1995 चे कलम 5(सी), 9, 9 (अ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.


या बाबत अधिक माहिती अशी की, (दि.8 जानेवारी) रोजी 11.00 वा.सु. परंडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार हे पथकासह परंडा पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करत असताना कुंभेजा फाटा येथे एक पिकअप वाहन सोनारी कडून परंडा कडे येत असताना दिसून आले. सदरील वाहनांमध्ये गोवंशीय जनावरांची कत्तलीसाठी वाहतुक करण्यात येत असेल असा संशय आल्यावरून पोलीसांनी सदरील वाहनाच्या चालकास गाडी थांबण्याचा इशारा केला. वाहन चालकाने गाडी रोडच्या बाजूला लावली, सदरील वाहनाचे निरीक्षण केले असता वाहनांमध्ये अत्यंत दाटीवाटीने गोवंशीय जनावरे भरले असल्याचे निदर्शनास आले. गाडीमधील गोवंशी जनावरे कुठून आणलेली आहेत आणि कशासाठी आणलेली आहेत या बाबत वाहन चालकाकडे चौकशी केली असता वाहनचालकाने समाधानकारक उत्तर दिले नाही. सदरील वाहन तात्काळ पोलीस ठाणे परंडा येथे घेण्याची सुचना सदरील वाहन चालकास दिली. वाहन पोलीस ठाणे परंडा येथे आल्यानंतर दोन पंचांच्या समक्ष सदरील वाहनाची झडती घेतली असता वाहनामध्ये एकुण चार देशी जातीच्या गाई तर दोन जर्सी जातीच्या गाई असा एकुण 6,80,000₹. किंमतीच्या 6 गाई सह पिकअप वाहन क्र.MH 48 AY5171 असे मिळून आले आहे.

सदरील गाईंना वाहनांमध्ये अत्यंत दाटीवाटीने भरण्यात आले होते. या गाईंना गाडीमध्ये हालचाल करण्यासाठी पर्याप्त जागा नव्हती. अत्यंत त्रासदायक पध्दतीने त्यांची वाहतुक करण्यात येत होती. त्यावरुन पोलीस ठाणे परंडा येथे गुन्हा नोंदणी क्रमांक 02/2024 प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम 1960 चे कलम 11(1)(अ)(डी), महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1995 चे कलम 5(सी), 9, 9 (अ) अन्वये गुन्हा नोंदवला गेला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती कविता मुसळे हे करीत आहेत. सदरील गुन्ह्यात वापरलेले पिकअप वाहन क्र.MH 48 AY5171 आणि गाई जप्त करण्यात आले असुन वाहनचालकास चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

अशा प्रकारे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक गौहर हसन, यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पवार, परंडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, पोलीस नाईक नितीन गुंडाळे, पोलीस अंमलदार भुजंग अडसुळ, रामराजे शिंदे, फिरोज शेख, वाहन चालक सरगर यांच्या पथकाने केली आहे.


