
श्री तुळजाभवानी मंदीर बनावट ॲप प्रकरणी सायबर पोलिसांची कंपनीला नोटीस…
श्री तुळजाभवानी मंदीर बनावट ॲप प्रकरणी सायबर पोलिसांची कंपनीला नोटीस…
धाराशिव (प्रतिक भोसले) – महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या नावे दुसऱ्या वेबसाईट वरून एक बनावट बोगस वेबबेस आणि आणि मोबाईल बेस ॲप्लीकेशन काढून (नाव गोपनीय) भाविकांची फसवणूक करत आर्थिक लूट केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी अनिल बापुराव चव्हाण (वय 57 वर्षे) सहायक व्यवस्थापक विद्युत श्री. तुळजाभवानी, रा. श्री तुळजाभवानी मंदीर कॉर्टर तुळजापुर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून (दि.14डिसेंबर) रोजी तुळजापूर पोलीस ठाण्यात पुजारी विजय सुनील बोदले (ॲप विक्रेता), रा.शुक्रवार पेठ, तुळजापूर याच्यावर भा.दं.सं. कलम 417,419,420 आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम 66C, 66D अंतर्गत गुन्हा नोंदवला होता. या पूर्वी देखील असेच एक प्रकरण झाल्या नंतर मंदिर संस्थानने चौकशी करून कारवाई करण्याच्या अनुषंगाने सायबर पोलिसांना पत्र पाठवले होते. त्याची दखल घेऊन संबंधित टेक्नॉलॉजी कंपनीला सायबर पोलिसांनी नोटीस दिली होती.


या बाबत थोडक्यात माहिती अशी की, वेबसाईट बेस ॲप्लीकेशनवर श्री. तुळजाभवानी मंदीराचे फोटो व श्री देवीजींचे फोटो तसेच श्री तुळजाभवानी मंदीराचा लोगो असलेले श्री. देवीजींचे छायाचित्र वापरुन विविध प्रकारच्या पुजाविधींची माहिती प्रसिध्द केली जात होती. सदर ॲपवर पुजेसाठी शुल्क सुध्दा स्विकारले जात होते. सदरील ॲप्लीकेशन श्री. तुळजाभवानी मंदीराचे ॲप्लीकेशन नसले बाबत कोठेही सुस्पष्टपणे व ठळक स्वरुपात नमुद पण केले नव्हते. तसेच हे ॲप्लीकेशन खाजगी स्वरुपाचे व खाजगी मालकीचे आहे असाही उल्लेख कुठे नव्हता. त्या वरून वरील बाब ही भाविकांची फसवणुक करण्याच्या उद्देशानेच नमुद केलेले नाहीत हे स्पष्ट होते. भाविकांना सदरील ॲप्लीकेशन मंदीराचे नाही हे समजुन येत नाही त्यामुळे भाविक ॲप मंदीर संस्थानचे अधिकृत ॲप्लीकेशन समजुन त्यावर रक्कम अदा करतात. या मध्ये मंदीराची आणि भाविकांची मोठ्या प्रमाणात फसवणुक होऊन अर्थिक नुकसान होत होते. म्हणुन मंदीर संस्थानने सदरची बाब जिल्हाधीकारी तथा अध्यक्ष तुळजाभवानी मंदीर संस्थान तुळजापुर यांच्या निदर्शनास आणून दिली. नंतर सदर ॲपचे स्क्रिनशॉट काढुन बनावट ॲपच्या स्क्रिनशॉटसह जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष श्री. तुळजाभवानी मंदीर संस्थान तुळजापुर यांना संदर्भ क्र.जा.क्र.श्री.तु.भ.मं.सं.तु./23-24/819 दि.18 जुलै 2023 अन्वये एक पत्र पोलीस अधीक्षक धाराशिव यांना सदर ॲपची चौकशी होऊन कार्यवाही कामी पाठविण्यात आले.

त्या नंतर श्री. तुळजाभवानी मंदीर संस्थान कार्यालयाला वेळोवेळी पोलीस निरीक्षक सायबर पोलीस स्टेशन धाराशिव यांनी मंदीर संस्थानच्या ॲप संदर्भातील माहितीच्या अनुषंगाने पत्रव्यहार करून माहिती दिली. त्यानंतर श्री. तुळजाभवानी मंदीर संस्थानला (दि.25 सप्टेंबर) रोजी संदर्भ क्रं. जाक्रं. सायबर/श्री.तु.भ.मं.सं.तु/ 2023-1421 अन्वये सायबर पोलीस ठाणे धाराशिव यांच्याकडील पत्र प्राप्त झाले. त्यामध्ये पोलीस निरीक्षक सायबर पोस्टे धाराशिव यांनी सदर प्रकरणाची चौकशी केल्याचे दिसुन आले.

सायबर पोलिसांनी पत्रव्यवहार केल्यानंतर दि.31 ऑगस्ट रोजी सायबर पोलीस स्टेशनला वेबसाईट – ॲप (नाव गोपनीय) यांचा मेल प्राप्त झाला त्यामध्ये (कंपनीचे नाव गोपनीय) कोलकत्ता, वेस्ट बेंगॉल येथील टेक्नॉलॉजी कंपनी मार्फत हे ॲप डेव्हलप केले असल्याचे समजले. त्या नंतर सदरचे ॲप बंद करणे कामी कलम ९१ प्रमाणे पोलिसांनी कंपनीला नोटीस पाठवली असता काही दिवसांनी श्री. तुळजाभवानी मंदीराची प्रोफाईल साईडवरुन रिमुव्ह करण्यात आली होती. आता या वेबसाईट ॲप्लीकेशन च्या माध्यमातुन भाविकांसह मंदिर संस्थानची फसवणुक करणारा आरोपी- पुजारी विजय बोदले याला अटक केली असून पुढील तपास चालू आहे.
पोलीस अधीक्षक – अतुल कुलकर्णी


