
पत्रकाराला धक्काबुक्की; धाराशिव मधील प्रोजेक्ट मॅनेजरवर गुन्हा दाखल…
पत्रकाराला धक्काबुक्की; धाराशिव मधील प्रोजेक्ट मॅनेजरवर गुन्हा दाखल…
सोलापूर (प्रतिक भोसले) – जबाबदारी पार न पाडण्याबाबत वार्तांकन केल्याचा राग मनात धरून एका यू ट्यूब चॅनल च्या पत्रकारास धमकी देऊन धक्काबुक्की करत वार्तांकनास अडथळा निर्माण केल्या प्रकरणी धाराशिव मधील प्रोजेक्ट मॅनेजरवर पत्रकार संरक्षण कायदयांतर्गत बार्शी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरण माने, प्रोजेक्ट मॅनेजर, स्वयम शिक्षण प्रयोग, रा.धाराशिव असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.


या बाबत अधिक माहिती अशी की, पत्रकार धिरज आगतराव शेळके वय (40 वर्षे), रा.महात्मा फुले शाळेजवळ, कसबा पेठ कचेरी रोड, बार्शी हे या ठिकाणी आपल्या कुटुंबासोबत राहतात. गेल्या पाच वर्षापासून हिंदवी समाचार नावाच्या यू ट्यूब चॅनलचे ते स्वतः संपादक म्हणुन काम बघतात. (दि.5 जानेवारी) रोजी बार्शी येथे कार्यरत असलेल्या उमेद अभियान अंतर्गत काम करणाऱ्या महिलांना त्यांचे मानधन न मिळाल्याने या महिला बार्शी पंचायत समिती येथे उपोषण करत बसल्या होत्या. या उपोषणाची बातमी पत्रकार शेळके यांनी त्यांच्या यु ट्यूब चॅनलवर प्रसारित केली होती. ही बातमी बघितल्या नंतर बिडीओ पंचायत समिती, बार्शी यांनी तोंडी आश्वासन दिले होते की, संबंधित अधिकाऱ्याला बोलावून विषय मार्गी लावतो.

परंतु त्यानंतर बरेच दिवस गेले तरी विषय मार्गी न लागल्याने काहीही कारवाई न झाल्यामुळे (दि.17जानेवारी) रोजी संबंधित स्वयंम शिक्षण प्रयोगचे प्रोजेक्ट मॅनेजर किरण माने रा.धाराशिव, यांना उमेद अभियानाचे शिवाजी आखाडा बार्शी येथील बीएसएनएस च्या बिल्डींग मधील ऑफिस मध्ये दुपारी बोलावुन घेतले. या वेळी उमेद अभियानात काम करणाऱ्या मानधन न मिळालेल्या महिला चर्चा करण्यासाठी उपस्थित होत्या. या ठिकाणी पत्रकार शेळके वार्तांकन करून महीलांची व प्रोजेक्ट मॅनेजर यांची प्रतिक्रिया घेत असताना स्वयंम शिक्षण प्रयोग धाराशिव संस्थेचे प्रोजेक्ट मॅनेजर किरण माने यांना सदर उपोषण कर्त्या महिलांचे मानधन काढले का नाही व काढले असेल तर ते कोणत्या आधारावर काढले. या बाबत विचारणा करत असताना त्यांनी मला भुक लागली आहे मला जेवायला जायचे आहे. असे उत्तर दिले या मुळे पत्रकार शेळके यांनी प्रोजेक्ट मॅनेजर यांना हया महिला पण सकाळपासुन येथे उपाशी बसलेल्या आहेत त्यांना पण जेवायला जायचे आहे असे म्हणले असता त्यांनी शुटिंग काढत असलेला मोबाईल हिसकावुन घेण्याचा प्रयत्न करून धक्काबुक्की व शिवीगाळी करून तुला कुठे गुन्हा दाखल करायचे आहे ते कर तुला बघुन घेईन असे म्हणुन धमकी देवुन निघुन गेले. अशी फिर्याद पत्रकार धिरज शेळके यांनी बार्शी शहर पोलिस ठाण्यात दिली. त्या नुसार दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी किरण माने, रा. धाराशिव यांच्यावर महाराष्ट्र प्रसार माध्यम व्यक्ती आणि प्रसार माध्यम संस्था, (हिंसा आणि मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक) अधिनियम 2017 अंतर्गत कलम 3 आणि 4 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी हे करीत आहेत.

2017 साली अस्तित्वात आलेल्या पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत दाखल झालेला सोलापूर जिल्ह्यातील हा पहिलाच गुन्हा आहे अशा सर्व प्रकाराला वेळीच आळा घालण्यासाठी नुसते कागदावर नाही तर पत्रकार संरक्षण कायद्याच्या कठोर अंमलबजावणीची गरज निर्माण झाली आहे. पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत, पत्रकारांना त्यांच्या पत्रकारितेच्या कामात अडथळा आणणाऱ्या किंवा त्यांना धमकी देणाऱ्या, हल्ले करणाऱ्या व्यक्तींना शिक्षा होऊ शकते. या कायद्याचा वापर करून पत्रकारांवर होणाऱ्या अत्याचारांना आळा घालण्यासाठी हा एक महत्त्वाचा निर्णय आहे. सरकारने या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी आता अनेक पत्रकार संघटनांमधून होत आहे.
स्वयम शिक्षण प्रयोग संस्थेचे पदाधिकारी, प्रोजेक्ट मॅनेजर,
किरण माने यांना झालेल्या घटनेबाबत प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी माझ्या हातातून मोबाईल हिसकावून , माझ्याशी हुज्जत घातली, धक्काबुक्की केली. त्या वेळेस मी त्यांना म्हणालो तुम्ही पत्रकाराला धक्काबुक्की करू शकत नाही. त्या वर ते म्हणाले की, तुम्हाला काय करायचे ते करा कुठं गुन्हा दाखल करायचा ते करा मी बघून घेईन असे म्हणाले, या नंतर मी हा झालेला प्रकार बार्शीतील पत्रकारांना सांगितला. त्या नंतर व्हॉईस ऑफ मीडियाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष, सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष आणि व्हॉईस ऑफ मीडिया बार्शी यांनी झालेल्या घटनेचा निषेध केला. अशा प्रकारचा परत पत्रकारांवर अन्याय होऊ नये म्हणून आम्ही बार्शी पोलीस ठाण्यात धाव घेतली. आणि त्या ठिकाणी पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांना या घटनेची माहिती दिली. त्या नुसार दिलेल्या माहितीवरून प्रोजेक्ट मॅनेजर किरण माने यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
पत्रकार – धिरज शेळके


