
पोलिस शिपायानेच केला महिला पोलिस निरीक्षकाचा विनयभंग; गुन्हा दाखल
पुणे : शहरात कार्यरत असलेल्या ५५ वर्षीय महिला पोलिस निरिक्षक महिलेचा मुंबईतील फोर्स वन पथकात कार्यरत असणाऱ्या एका ३४ वर्षीय पोलिस शिपायाने विनयभंग केल्याची घटना सिंहगड रोडवरील अभिरुची पोलिस चौकीत घडली आहे. याप्रकरणी महिला पोलिस निरीक्षक यांच्या फिर्यादीवरून निलेश भालेराव (रा. कोले कल्याण, पोलिस वसाहत बिल्डींग १, रुम नं. ४०४, सांताक्रुझ, मुंबई) याच्याविरोधात विनयभंग केल्याप्रकरणी सिंहगडरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार महिला पोलिस निरीक्षक या २०१८ साली पुण्यातील एमआयए येथे नेमणुकीस होत्या. त्यावेळी आरोपी निलेश भालेराव हा फोर्स वनच्या ट्रेनिंगसाठी एमआयए येथे आला होता. त्यावेळी त्याने संबंधित महिला अधिकाऱ्याच्या शासकीय कामात अडथळा निर्माण करून त्यांचा विनयभंग केला होता. या प्रकारानंतर तक्रारदार महिला उपनिरीक्षकांनी त्याच्याविरोधात वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर निलेश भालेरावच्या कुटुंबियांनी केलेल्या विनंतीवरून तो गुन्हा मागे घेण्यात आला होता. मात्र, त्यानंतरही निलेश भालेराव सतत महिला अधिकाऱ्याच्या मोबाईलवर फोन करून त्यांना त्रास देत होता. त्यामुळे याबाबतची अदखलपात्र स्वरूपाची तक्रार त्यांनी अभिरुची पोलिस चौकी येथे केली होती.


त्यानंतर तक्रारदार या त्यांच्या पतीसोबत घरी जात असताना, संबंधित आरोपीने ‘काही बरोबर केले नाही, माझा त्रास तुम्ही आणखी वाढवला’ असे मोठ्याने बोलला. तसेच तक्रारदार या अभिरुची चौकीतून बाहेर जात असताना, त्यांच्यावर हल्ला केला. त्यांना ढकलून त्यांच्या शरीराला वाईट हेतूने स्पर्श करत त्यांच्या मनाला लज्जा निर्माण करून त्यांचा विनयभंग करत शिवीगाळ केली. तेव्हा पोलीस चौकीतील पोलिसांनी लगेच निलेश भालेराव याला पकडले.



