अंबड गोळीबार प्रकरणातील आठ गुंडांवर नाशिक शहर पोलिसांची मोक्का अंतर्गत कार्यवाही…
अंबड येथील गोळीबार प्रकरणातील टोळीतील ८ गुन्हेगारांवर नाशिक शहर पोलिसांची मोक्का अंतर्गत कारवाई…
नाशिक (शहर प्रतिनिधी) – अंबड पोलिस ठाणे हद्दीतील फायरिंग च्या गुन्ह्यातील गुन्हेगारी टोळीतील आठ जणांवर पोलिसांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. पोलिस आयुक्त, नाशिक शहर संदीप कर्णिक यांनी अंबड पोलिस स्टेशन येथील गुरनं २३३/२०२४ भादवि कलम ३०७,१२०६,१४३,१४७,१४८, १४९ भारतीय हत्यार कायदा ३/२५, ४/२५, ५(अ)/२७ सह कि. ॲमेंडमेंट लॉ कलम ७ मपोका कलम १३५ प्रमाणे दाखल गुन्हयात निष्पन्न ०८ आरोपींविरुध्द मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश (दि.०३मे) रोजी निर्गमीत केले होते.
अंबड पोलिस ठाणे हद्दीतील फिर्यादी वैभव शिर्के व गुन्हेगार दर्शन दोंदे यांचे वर्चस्वाच्या कारणावरून वाद होते. दुचाकी वाहनाने कट लागल्याच्या करणावरुन त्यांचा वाद विकोपाला जाऊन (दि.०७एप्रिल) रोजी यातील फिर्यादी वैभव शिर्के हा त्याचे मित्रासोबत मोटार सायकलने जात असताना गुन्हेगार नामे दर्शन दोंदे, गणेश खांदवे, राकेश गरूड, अक्षय गावंजे, खग्या उर्फ अथर्व राजधिरे, बट उर्फ अजय राऊत व त्यांचे इतर साथीदार यांनी वैभव शिर्के याचेवर दोन गावठी पिस्टलने फायर करून तसेच कोयता व चॉपरने हल्ला करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याने अंबड पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयाचे तपासात गुन्हयातील मुख्य आरोपी व गुन्हेगारी टोळीचा सुत्रधार दर्शन उत्तम दोंदे (वय २९ वर्षे), रा.कामटवाडे राजवाडा, आंबेडकर पुतळ्याजवळ, कामटवाडा नाशिक हा सराईत गुंड प्रवृत्तीचा असुन त्याने त्याचे साथीदार १) गणेश दत्तात्रय खांदवे (वय २८) रा. इंदीरानगर नाशिक, २) राकेश कडु गरूड (वय ३२) रा. उत्तमनगर सिडको ३) अथर्व दिलीप राजधर उर्फ खग्या (वय २०) रा.पाथर्डीफाटा नाशिक ४) अजय रमेश राउत उर्फ बट (वय २७) रा.होलाराम कॉलनी नाशिक ५) जितेंद्र अशोक चौधरी उर्फ छोटया काळया (वय २६) रा.बंदावणे नगर सिडको नाशिक ६) महेश दत्तात्रय पाटील उर्फ बाळा (वय २१) रा.रायगड चौक सिडको नाशिक ७) अक्षय गणपत गावंजे (वय २४) रा.सावतानगर सिडको, नाशिक यांचे सोबत मिळुन गुन्हेगारी टोळी निर्माण केली असुन एकटयाने किंवा संघटीतरित्या घातक हत्यारे जवळ ठेवून अंबड, उपनगर, आडगाव, सरकारवाडा, मुंबईनाका, इंदीरानगर परिसरात लोकांना धमकावुन मारहाण करणे, खुन करणे, खुनाचा प्रयत्न करणे, वाहनांची जाळपोळ करणे व घातक शस्त्रे घेवून दंगे करुन परिसरात दहशत निर्माण करत होते. टोळी प्रमुख दर्शन उत्तम दोंदे याने गुन्हा करतांना टोळीतील सदस्यांच्या सहाय्याने संयुक्तपणे हिंसाचाराचा, अवैध शस्त्रांचा वापर करून धाकदपटशा दाखवुन परिसरात वर्चस्व निर्माण करून घातक शस्त्रे वापरून गुन्हेगारी कृत्य चालु ठेवलेले आहे. सदर टोळीतील सदस्यांविरुध्द अंबड, सरकारवाडा, उपनगर व इतर पोलिस ठाणे अंतर्गत एकुण ५३ गुन्हे दाखल झालेले आहेत.
वरील गुन्हयातील टोळी प्रमुख आणि इतर यांनी नियोजीतबध्द कट रचुन गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झालेले असुन त्यांनी संघटीतरित्या गुन्हा केला असल्याने पोलिस आयुक्त, नाशिक शहर संदीप कर्णिक यांनी गुन्हयाचे गांभीर्य ओळखुन गुन्हयातील आरोपींविरूध्द कठोर कारवाई होणेकरीता महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी अधिनियम १९९९ (मोक्का) कलम ३(१) (॥), ३(२), ३(४) ही वाढीव कलमे लावुन मोक्का कायदयाअंतर्गत ठोस कारवाई केली आहे. या गुन्हयाचा पुढील तपास सहा. पोलिस आयुक्त, अंबड विभाग नाशिक शहर शेखर देशमुख यांचेकडे सोपविण्यात आला आहे.पोलिस आयुक्त,संदीप कर्णिक यांनी सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण होईल असे गुन्हेगारी कृत्य व गुन्हे करुन सर्वसामान्य जनतेचे जनजिवन विस्कळीत करणारे गुन्हेगारी टोळीवर मोक्का कायदयान्वये ठोस प्रतिबंधक कार्यवाही केल्यामुळे नाशिक शहरातील नागरीकांनी सदर कार्यवाही बाबत समाधान व्यक्त केले आहे. संदिप कर्णिक, पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांनी शहरातील गुन्हेगार त्यांच्या गुन्हेगारी वृत्तीपासुन परावृत्त होणार नाहीत, त्यांच्यावर मोक्का, एम.पी.डी.ए. सारख्या ठोस कारवाया सुरूच राहणार असल्याबाबत सांगितले.