
मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर चालत्या कुरीयर गाडीवर पडलेल्या ३ कोटी च्या दरोड्याची उकल करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश,५ आरोपी अटकेत,आरोपींना पोलिस कोठडी…
तीन कोटींच्या सशत्र दरोड्याप्रकरणी आंतरराज्य टोळीला पोलिस कोठडी…
नाशिक (प्रतिनिधी)- गेल्या आठवड्यात मुंबई-आग्रा महामार्गावरील मुंढेगाव शिवारात कुरिअर सर्व्हिसच्या वाहनाला अडवण्यात आले. संशयितांनी वाहनातील व्यक्तींना शस्त्राचा धाक दाखवत सुमारे तीन कोटींचा ऐवज लंपास केला होता. याप्रकरणी पाच संशयितांना नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हेशाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले आहे.


या बाबत अधिक माहिती अशी की, (दि.18 जानेवारी) रोजी मुंबई-आग्रा महामार्गावरील मुंढेगाव शिवारात बजरंग कुरिअर सर्व्हिसेस कंपनीची कुरिअर व्हॅन मुंबईकडून नाशिककडे प्रवास करत होती. यावेळी कारमधून आलेल्या पाच ते सहा संशयितांनी कुरिअर व्हॅनला अडवले. तसेच कुरिअर व्हॅनच्या चालकाच्या डोळ्यात मिरची पुड फेकली. त्यानंतर व्हॅनमधील इतरांना लोखंडी रॉडचा धाक दाखवण्यात आला. व्हॅनमधील 3 कोटी 67 लाख 55 हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरांनी लंपास केले. यासंबधात घोटी पोलिस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे स्थानिक गुन्हेशाखेने दरोडेखोरांची ओळख पटवण्यास सुरुवात केली. दरोडेखोर उत्तरप्रदेशातील आग्रा परिसरातील असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तीन दिवस पाळत ठेवल्यानंतर पोलिसांनी पाच संशयितांना जेरबंद केले. या मध्ये दोन माजी सैनिकांचाही समावेश आहे.

देवेंद्रसिंग उर्फ करवा सतवीर परमार (वय 33), आकाश रामप्रकाश परमार (वय 22, दोघे रा. ता. खेरागड, जि. आग्रा, राज्य उत्तरप्रदेश), हुबसिंग मुल्लासिंग ठाकूर (42, रा. चेंकोरा, राज्यस्थान), शिवसिंग बिजेंद्रसिंग ठाकूर (45) व जहिर खान सुखा खान (वय 52, रा. ता. खेरागड, जि. आग्रा) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. यापैकी हुबसिंग ठाकूर व जहिर खान हे माजी सैनिक आहेत.
संशयितांनी दरोड्यात चोरलेले सोन्याचे व चांदीचे दागिने जमिनीत गाडून ठेवले होते. सखोल तपासात पोलिसांनी अडीच किलो सोने व ४५ किलो चांदीचे दागिने आणि दरोडा टाकण्यासाठी वापरलेली कार असा सुमारे पावणे दोन कोटीं रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
न्यायालयाने संशयितांना ९ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरोड्याचा मुख्य सुत्रधार देवेंद्रसिंग याच्याविरोधात गुजरात राज्यातही दरोडा टाकून सोने चोरी केल्याचे उघड झाले आहे. गुन्ह्यातील संशयित सतेंदरसिंग यादव (रा. भोजपूर, जि. आग्रा) या माजी सैनिकासह दालचंद गुर्जर (रा. खेरागड, जि. आग्रा) व नंदु गारे (रा. ता. चांदवड, जि. नाशिक) हे संशयित फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
अशा प्रकारे सदर गुन्हयाच्या तपासात वरिष्ठांनी केलेल्या मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, घोटी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विनोद पाटील, सपोनि संदेश पवार, तसेच स्थागूशाचे सपोनि गणेश शिंदे, पोहवा नवनाथ सानप, नापोशि विश्वनाथ काकड, पोहवा सागर काकड, शांताराम घुगे, योगेश पाटील, सुधाकर बागुल, हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम, पोशि नौशाद शेख, तसेच घोटी पोलिस स्टेशनचे पोउनि. सुदर्शन आवारी, नापोशि रामकृष्ण लहामटे, मिलींद पवार, चालक पोहवा भुषण थोरमिसे यांच्या पथकाने वरील दरोडयाचा गुन्हा उघडकीस आणून कामगिरी केली आहे. पोलिस पथकांनी केलेल्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांनी तपास पथकास २५,०००/- रू. चे बक्षीस जाहीर करून सर्वांचे अभिनंदन केले आहे.


