
पुंछमध्ये लष्कराच्या वाहनांवर हल्ला, 5 जवान शहीद
पुंछमध्ये लष्कराच्या वाहनांवर हल्ला, 5 जवान शहीद
जम्मु काश्मीर (वृत्तसंस्था) – काल गुरुवार (21 डिसेंबर) रोजी सशस्त्र दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरमधील पुंछमध्ये लष्कराच्या दोन वाहनांवर हल्ला केला. यामध्ये पाच जवान शहीद झाले असून दोन जण जखमी झाले आहेत. राज्याचे दोन माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद आणि मेहबुबा मुफ्ती यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. या हल्ल्याची जबाबदारी पीएफएफने घेतली आहे. लष्कर-ए-तैयबा (एलईटी) ची पाकिस्तानस्थित शाखा पीपल्स अँटी फॅसिस्ट फ्रंट (PFF) ने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. लेफ्टनंट कर्नल सुनील बारटवाल यांनी सांगितले की, दहशतवाद्यांबाबत मिळालेल्या भक्कम गुप्त माहितीच्या आधारे बुधवारी रात्री पूंछ जिल्ह्यातील ढेरा की गली भागात संयुक्त शोध मोहीम राबवण्यात आली. सैनिक घटनास्थळाकडे जात असताना दहशतवाद्यांनी दोन वाहनांवर गोळीबार केला.


20 डिसेंबरपासून सुरक्षा दलांनी या भागात दहशतवाद्यांविरोधात घेराव आणि शोध मोहीम सुरू केली होती. त्याचवेळी, गुरुवारी संध्याकाळी साडेचारच्या सुमारास दहशतवाद्यांनी पाळत ठेवून हा हल्ला केला. ज्यावेळी हा हल्ला करण्यात आला त्यावेळी लष्कराच्या दोन गाड्यांमधून सैनिक प्रवास करत होते. महिनाभरात याच भागात दहशतवाद्यांनी लष्करावर केलेला हा दुसरा हल्ला आहे. यापूर्वी 22 नोव्हेंबरला राजौरी येथे झालेल्या चकमकीत 5 जवान शहीद झाले होते.

जम्मूमधील संरक्षण पीआरओ लेफ्टनंट कर्नल सुनील बारटवाल यांनी सांगितलं की, दहशतवाद्यांच्या उपस्थितीची ठोस माहिती मिळाल्यानंतर 20 डिसेंबरच्या रात्री पूंछ जिल्ह्यातील थानामंडी-सुरनकोट भागातील ढेरा की गली भागात संयुक्त शोध मोहीम सुरू करण्यात आली. सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. अतिरिक्त सुरक्षा दल घटनास्थळाकडे जात असताना दहशतवाद्यांनी लष्कराच्या ट्रक आणि जिप्सीवर गोळीबार केला.



