
हिंदू राष्ट्र सेनेच्या धनंजय देसाईचा जामीन फेटाळला
पुणे : जमीन नावावर करुन न दिल्याने एका शेतकऱ्याला बेदम मारहाण केल्याप्रकरणी अटकेत असलेला हिंदू राष्ट्र सेनेचा प्रमुख धनंजय देसाई याचा जामीन जिल्हा आणि सत्र न्यायाधीश व्ही.डी. निंबाळकर यांनी फेटाळला. मुळशीतील दारवली गावात दि.1 ऑगस्ट रोजी ही घटना घडली होती.
याबाबत प्रदीप शिवाजी बलकवडे (वय 35, रा. दारवली, ता. मुळशी, जि. पुणे) यांनी पौड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी सरकारी पक्षातर्फे ॲड. विलास घोगरे पाटील यांनी, तर फिर्यादीतर्फे ॲड. अमेय बलकवडे, ॲड. सतिश कांबळे, ॲड. सुरज शिंदे आणि ॲड. ऋषिकेश कडू यांनी बाजू मांडली. देसाई याच्यावर विविध पोलीस स्टेशनमध्ये तब्बल 17 गुन्हे दाखल आहेत.


यामध्ये जातीय तेढ निर्माण करणे, खून, हत्यार कायद्यांचे उल्लंघन अशा गुन्हांचा समावेश आहे. तलवारी, कोयतेसारखी हत्यारे मिळून आली आहेत. गुन्ह्यातील फरार आरोपींचा शोध घ्यायचा आहे. गुन्ह्यात वापरलेल्या पिस्तुलाचा तपास करायचा आहे. घटना घडल्यानंतर चर्चा करताना देसाई सीसीटीव्हीमध्ये दिसून आला आहे. याचा विचार करून जामीन फेटाळण्याची मागणी सरकारी पक्ष आणि फिर्यादीच्या वकिलांनी केली.

घटनेच्या दिवशी बलकवडे गावातील सचिन ठोंबरे यांच्या घरात बसले होते. त्यावेळी देसाईचे साथीदार घरात शिरले. धनंजय देसाई यांच्या नावावर जमीन का करुन दिली नाही, अशी विचारणा करुन त्यांना धमकावले. जमीन नावावर करुन न दिल्यास तुझ्यासह कुटुंबीयांना जीवे मारु, अशी धमकी दिली. बलकवडे यांना एका आरोपीने पिस्तुलाचा धाक दाखवून मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.



