चारित्र्याच्या संशयावरून केला पत्नीचा खून; पतीला अटक
पुणे: चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर चाकूने वार करून तिचा खून करण्यात आल्याची घटना लोहगावमधील संतनगर भागात घडली. या प्रकरणी पतीला विमानतळ पोलिसांनी अटक केली. रुपाली उर्फ बबिता आशिष भोसले (वय ३५, रा. संतनगर, लोहगाव) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पती आशिष सुनील भोसले (वय ३२, रा. संतनगर, लोहगाव) याला अटक करण्यात आली आहे. याबाबत स्वप्नील बाळासाहेब खांदवे यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
भोसले दाम्पत्य लोहगाव भागातील संतनगर परिसरात भाड्याने खोली घेऊन राहत होते. आरोपी आशिष सफाई कामगार आहे. गेल्या काही महिन्यांपासून आशिष पत्नी रुपालीच्या चारित्र्याचा संशय घेऊन तिचा छळ करत होता. दोघांमध्ये वाद झाला. वादातून त्याने स्वयंपाकघरातील सुरीने पत्नी रुपालीवर वार केले. या घटनेची माहिती शेजाऱ्यांना मिळाली. शेजाऱ्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. रुपालीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच तिचा मृत्यू झाला होता.
पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे, सहायक आयुक्त संजय पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सोंडे यांनी घटनास्थळी भेट दिली. आराेपी आशिषला पोलिसांनी अटक केली असून, सहायक पोलीस निरीक्षक संजय धामणे हे पुढील तपास करत आहेत.