
महिलेने पोलिस आयुक्तालयाच्या पायरीवर अंगावर घेतले रॅाकेल
संभाजीनगर – शहरात नात्यातल्याच २३ वर्षिय तरुणावर २६ वर्षीय विवाहित तरुणीने विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी त्याच्यावर प्राथमिक कारवाईही केली. मात्र, तरुणीने पतीसह त्याच्या घरी जात त्याला बेदम मारहाण केली. रविवारी तिच्यासह पतीवर मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
यानंतर दोन तासांत पोलिस आयुक्तालयात जात पायऱ्यांवर अंगावर रॉकेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला. परंतु कर्तव्यावरील पोलिसांनी धाव घेत तिच्या हातातून काडीची पेटी ओढल्याने अनुचित प्रकार टळला. २६ वर्षीय तक्रारदार महिलेने २४ ऑगस्ट रोजी सिडको पोलिस ठाण्यात गोकुळ पाटोळे याच्याविरोधात तक्रार दिली. १८ ऑगस्ट रोजी पैशांच्या व्यवहारातून घरात गैरप्रकार केल्याच्या आरोपावरून त्याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी त्याच्यावर चॅप्टर केसही केली. महिलेचा न्यायालयासमोर जबाब नोंदवला. त्यानंतर मात्र, या तरुणीने २ सप्टेंबर रोजी पती व अन्य दोघांसह गोकुळच्या घरी जात त्याला बेदम मारहाण करत डोक्यात फरशी फोडली. आपल्यावर गुन्हा दाखल झाल्याचे कळताच तक्रारदार तरुणीने दोन तासांत पोलिस आयुक्तालय गाठत पाययांवरच रॉकेल ओतून घेत पेटवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनुचित प्रकार टळला. बेगमपुऱ्याचे उपनिरीक्षक विनोद भालेराव यांनी धाव घेत तिला रुग्णालयात दाखल केले. गोकुळवर अपेक्षित कारवाई न झाल्याने पाऊल उचलल्याचे कारण देत गोकुळविरोधात दुसरी तक्रार तिने दिली. त्यावरून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.




