
रेतीचा घाट मरणाची वाट…….
रेती घाटावरील आर्थिक व्यवहाराच्या वादावरुन पुलगाव येथील रेती माफीया भरत नागपाल यांचा त्याचेच साथीदारांनी केला निर्घुन खुन…..
चंद्रपूर-वर्धा (प्रतिनिधी) – विदर्भातील सर्वच जिल्ह्यात जवळपास सर्वत्र रेती घाटाचे लिलाव कोट्यवधी रुपयात करण्यात आले आहे, तरी या घाटातून रेती घेणार तरी कोण हा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे, कोट्यवधी रुपयांची जुळवाजुळव करताना रेती व्यवसायिक यामध्ये इतरांना भागीदारी देत हा व्यवसाय करीत असून या धंद्यातून आता संघटित गुन्हेगारी उदयास आली,अशीच एक घटना चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील बामर्डा रेती घाटात १ मार्चला रात्री दोन गटाच्या वादात वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथील रहीवासी असलेले व भाजप महामंत्री भारत नागपाल यांची हत्या करण्यात आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.



याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की वरोरा तालुक्यातील वना नदीचा रेती घाट हा गीतेश सातपुते राहणार भद्रावती हल्ली मुक्काम नागपूर यांना मिळाला होता, सातपुते यांच्याकडून सदर घाट पंकज वानखडे, दिनेश नागपाल, भरत नागपाल, कैलास धारवाल, भूषण वाघमारे, मयूर गौरकार, योगेश रामटेके, राजू गोवारदिपे, हर्षल बोधाने, प्रवीण घुरडे, अमोल ठोंबरे व अमित साहू यांनी वर्ष २०२५ मध्ये २ कोटी ५ लक्ष रुपयात घेतला होता, तो घाट ९ जून २६ पर्यंत वानखेडे व त्यांच्या भागीदार यांच्याकडे होता. मात्र २५ जानेवारीला मुदत पूर्ण व्हायच्या आधी सातपुते यांनी सदर घाट परत मागितला.व त्यानुसार २ कोटींपैकी ९८ लाख ६४ हजार ६२१ रुपये गीतेश सातपुते यांनी २८ फेब्रुवारीला परत करणार असे सांगितले होते.

ठरल्यप्रमाणे १ मार्च ला कैलास धारवाल यांनी मोबाईलद्वारे संपर्क करीत गीतेश सातपुते यांना उर्वरित रकमेबाबत विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे १ मार्चला सायंकाळी पंकज वानखेडे, भारत नागपाल, कैलास धारवाल, भूषण वाघमारे, अमोल ठोंबरे, अमित साहू, विराज शिंदे, मयूर गौरकार, योगेश रामटेके, राजू गोवारदीपे, गणेश खडसे हे ३ चारचाकी वाहनाने बामर्डा रेती घाटावर पोहोचले. त्या वेळी त्या घाटावर रेतीचा उपसा सुरु होता, काही वेळाने मयूर गौरकार यांच्या मोबाईलवर गीतेश सातपुते यांनी कॉल करीत तुम्ही घाटावर आले का, थांबा बघतो तुम्हाला असे म्हणत फोन कट केला, सातपुते यांच्या सांगण्यावरून पोकलँड ऑपरेटरनी घाटातून बाहेर जाण्याचा मार्ग बंद केला, तुम्ही आमचा मार्ग का बंद केला असे विचारले असता सातपुते भाऊ यांनी तुम्हाला थांबायला सांगितले आहे असे म्हटले. काही वेळाने त्या घाटावर चारचाकी वाहन आले त्यामधून अमोल कामडी, अक्षय विजयराव खडसे व इतर तीन लोक उतरले त्यांच्या हातात तलवार व लाकडी दांडा होता. दुसऱ्या वाहनाने सौरभ दिलीपसिंह ठाकूर हा हातात तलवार घेऊ आला त्याचेसोबत सुनील नारायण झोरे, प्रफुल सूर्यभान उमाटे, अतुल पुरुषोत्तम मोटघरे हे लाकडी दांडे व लोखंडी रॉड घेऊन पंकज वानखेडे यांच्याजवळ आले.व काही न विचारता सौरभ ठाकूर यांनी तलवारीने वानखेडे यांच्यावर हल्ला केला, त्यावेळी भारत नागपाल यांनी त्याला वाचविले मात्र दुसरा वार ठाकूर यांनी भरत नागपाल वर केला असता त्यांच्या डोक्याच्या मागच्या बाजूला तलवार लागली व ते खाली कोसळले. गितेश सातपुते यांच्या लोकांनी पंकज वानखेडे सोबत आलेल्याना बेदम मारहाण केली, भारत नागपाल ला ठाकूर, कामडी व खडसे यांनी मारहाण करीत त्याला नदीत फेकले, पाणी खोल असल्याने नागपाल हे बुडाले ते स्वतःला वाचविण्यासाठी धडपड करीत होते. यावेळी तिथे असलेल्या चारचाकी वाहनांची तोडफोड करीत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला.

काही वेळात स्थानिक पोलिस घाटावर पोहोचले, नागरिकांच्या मदतीने भारत नागपाल यांना पाण्यातून बाहेर काढले मात्र ते काही हालचाल करीत नव्हते, त्यांना तात्काळ हिंगणघाट येथील रुग्णालयात नेण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. वरोरा पोलिसांनी या प्रकरणी गितेश सातपुते, अमोल रामचंद्र कामडी, अक्षय विजयराव खडसे, सौरभ दिलीपसिंग ठाकूर, सुनील नारायण झोरे, प्रफुल सूर्यभान उमाटे, अतुल पुरुषोत्तम मोटघरे, पोकलँड ऑपरेटर, दोन दिवाणजी यांच्यावर कलम १२६ (२), ३२४ (५), १९२, १९१ (३), १९०, १८९ (४), १०९(१) व १०३ (१) अन्वये गुन्हा दाखल केला असून यामधील काही आरोपीना अटक करण्यात आली आहे.
रेती घाटाच्या वादातून झालेली हि हत्या महसूल व पोलिस प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे, बामर्डा घाटावर पोकलँड च्या साहाय्याने रेतीचा उपसा रात्री पर्यंत सुरु होता, त्याठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे नाही, वाळूचा उपसा मध्यरात्रीपर्यंत करण्यासाठी मोठं अर्थकारण करण्यात आलं अशी माहिती आहे, अश्या रेती घाट व्यावसायिकांना प्रशासनाचे अभय प्राप्त होते. मृतक भारत नागपाल हा भारतीय जनता पक्षाचा पुलगाव शहर महामंत्री होता, त्यांच्या हत्येने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.



