वाशिम एरंडा येथील खुन प्रकरणात ७ आरोपी पोलिसांच्या ताब्यात,पोलिस कोठडीत केली रवानगी…
जऊळका(वाशिम) – सवीस्तर व्रुत्त असे की शेतीच्या मालकी हक्कावरील दिवाणी वादाचे रुपांतर हाणामारीत होऊन त्यामध्ये दि.११.१०.२०२३ रोजी ग्राम एरंडा येथील शेतकऱ्यास ठार मारण्यात आले होते. सदर प्रकरणातील एकूण ०७ आरोपींना जऊळका पोलिसांनी अटक केली आहे. पोलिस स्टेशन .जऊळका हद्दीतील ग्राम कार्ली शेत शिवारात असलेली गट क्र.३१४ मधील शेतजमिनीच्या मालकी हक्कावरून ग्राम एरंडा येथील रहिवाशी मयत गजानन उत्तम सपाटे व ग्राम कार्ली येथील रहिवाशी नारायण सखाराम डुकरे, मधुकर सखाराम डुकरे, किसन सखाराम डुकरे, नर्मदाबाई सखाराम डुकरे यांच्याशी दिवाणी स्वरूपाचा वाद न्यायालयात प्रलंबित होता. दि.११.१०.२०२३ रोजी सायंकाळी मयत गजानन उत्तम सपाटे यांनी ग्राम कार्ली शेत शिवारातील शेतीतील सोयाबीन काढून ते कट्टे गावातील हनुमान मंदिराच्या पारावर ठेवले होते. सायंकाळच्या सुमारास छोटा हत्ती वाहन क्र.MH-37-T-1670 ने ग्राम कार्ली येथील आरोपी तेथे आले व त्यांनी शेतीचा वाद उकरून काढत मयतास लोखंडी रॉड, लाठी-काठी व लाथा बुक्यांनी बेदम मारहाण केली. मयत रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडलेला पाहून आरोपींनी छोटा हत्ती वाहन क्र.MH-37-T-1670 मध्ये बसत तेथून पळ काढला.
सदर प्रकरणी मयताच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिस स्टेशन जऊळका येथे अप.क्र.३०२/२३, कलम ३०२, १४३, १४७, १४८, १४९, ५०४ भादंवि अन्वये गुन्हा नोंदवून तपासात घेण्यात आला आहे. सदर प्रकारणात आतापर्यंत ०७ आरोपींना अटक करण्यात आली असून आरोपींमध्ये ०४ महिला व ०३ पुरुषांचा समावेश असून मा.न्यायालयाने महिला आरोपींना न्यायालयीन कोठडी तर पुरुष आरोपींना दि.१६ ऑक्टोंबर, २०२३ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
सदर प्रकरणाचा तांत्रिक पुरावे व मागील वादाचे वैमनस्याच्या पार्श्वभूमीवर पुढील तपास पोलिस स्टेशन जऊळका चे पोउपनि.अमोल गोरे व तपास पथक हे करत आहेत.