
‘आज तक’चे सुधीर चौधरींवर गुन्हा दाखल; कर्नाटक पोलिसांची कारवाई
कर्नाटक : देशातील विविध वृत्तवाहिन्यांच्या १७ निवेदकांच्या कार्यक्रमात प्रवक्ते न पाठवण्याचा निर्णय इंडिया आघाडीकडून घेण्यात आला आहे. त्यावरून राजकीय वादाला तोंड फुटलेलं असतानाच आता आजतकचे प्रसिद्ध निवेदक सुधीर चौधरी यांच्यावर कर्नाटक पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. सरकारी योजना आणि अनुदानावर केलेल्या कार्यक्रमात लोकांची दिशाभूल करत सामाजिक तेढ निर्माण करण्यात आल्याचा आरोप कर्नाटक पोलिसांनी केला आहे. याशिवाय कर्नाटक सरकारच्या जाहिरातीतून चुकीचा मेसेज लोकांसमोर ठेवण्याचा प्रयत्न सुधीर चौधरी यांनी केल्याचा आरोप बंगळुरू पोलिसांनी केला आहे. त्यामुळं आता यावरून नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
आजतक या वृत्तवाहिनीवर निवेदक सुधीर चौधरी यांनी ब्लॅक अँड व्हाईट शोमध्ये कर्नाटक सरकारच्या योजना आणि अनुदानाच्या कार्यक्रमांवर वार्तांकन केलं होतं. त्यात हिंदूंना वगळून भेदभावपूर्ण पद्धतीने योजनांचा लाभ दिला जात असल्याचं म्हटलं होतं. यासंदर्भातील ग्राफिक्सही सुधीर चौधरी यांनी सोशल मीडियावर शेयर केलं. कर्नाटक सरकारच्या विविध योजनांतून एससी, एसटी आणि ओपन प्रवर्गाच्या लाभार्थ्यांनाही लाभ मिळतो, परंतु ही बाब त्यांनी जाणीवपूर्वक लपवून ठेवत केवळ धार्मिक अल्पसंख्याक गटातल्या लाभार्थ्यांनाच योजनांचा लाभ मिळत असल्याचा दावा केल्याचा आरोप कर्नाटक पोलिसांनी केला आहे. या प्रकरणात केएमडीसीचे सहाय्यक प्रशासक शिवकुमार यांच्या तक्रारीवरून बंगळुरू पोलिसांनी सुधीर चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळं आता चौधरी यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.


केवळ धार्मिक अल्पसंख्याकांना अनुदान दिलं जात असून हिंदूंना योजनांपासून वंचित ठेवलं जात आहे. कर्नाटकातील सरकारी योजनेत गरीब हिंदूंवर अन्याय झाल्याचा आरोप या शोमध्ये करण्यात आला, त्यामुळं कर्नाटकातील जातीय सलोखा बिघडवण्याचा कट रचला गेल्याचं पोलिसांनी एफआयआरमध्ये म्हटलं आहे. याशिवाय एफआयआरला उत्तर देताना सुधीर चौधरी यांनी न्यायालयात आरोपांविरुद्ध लढण्याची तयारी जाहीर केली.

सुधीर चौधरी म्हणाले की, कर्नाटकमधील काँग्रेस सरकारनं माझ्याविरुद्ध दाखल केलेल्या एफआयआरची माहिती मला मिळाली आहे. प्रश्न असा आहे की एफआयआर का?, एफआयआरमध्ये अजामीनपात्र कलमांचा समावेश आहे, ज्यामुळं मला अटक होण्याची शक्यता आहे. माझा प्रश्न हिंदू समाजाला स्वावलंबी सारथी योजनेतून वगळण्याबाबत होता. या लढाईसाठी मी तयार आहे. आता न्यायालयात भेटू, असं म्हणत सुधीर चौधरी यांनी कर्नाटक सरकारला कायदेशीर आव्हान दिलं आहे.



