जवानाने केली गरोदर पत्नीसह 4 वर्षाच्या चिमुकलीची हत्या
नांदेड : दुहेरी हत्याकांडाने मराठवाड्यातील नांदेड जिल्हा हादरला आहे. सुट्टीवर घरी आलेल्या लष्करातील जवानाने गरोदर पत्नीसह आपल्या 4 वर्षाच्या चिमुकलीचा गळा आवळून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना कंधार तालुक्यातील बोरी येथे घडली. या दुहेरी हत्याकांडानंतर मारेकरी जवान स्वतःहून माळाकोळी पोलिस स्टेशनमध्ये हजर झाला. एकनाथ मारुती जायभाये (वय- 32) असे आरोपीचे नाव असून भाग्यश्री एकनाथ जायभाये (वय- 25) आणि मुलगी सरस्वती एकनाथ जायभाये (वय- 4) अशी मृत मायलेकीची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, कंधारच्या बोरी येथील रहिवासी एकनाथ मारुती जायभाये हा भारतीय लष्करात नोकरी करतो. राजस्थानमधील बिकानेर येथे तो कर्तव्य बजावत होता. गेल्या चार दिवसांपासून तो सुट्टीवर आपल्या गावी आला होता. तीन दिवस परिवारासोबत आनंदाने राहिला. चार वर्षीय चिमुकलीला अंगा- खांद्यावर खेळवले. पत्नीशी नीट वागला. मात्र, बुधवारी (13 सप्टेंबर) पहाटे 6 वाजेच्या सुमारास त्याने आपली आठ महिन्याची गर्भवती असलेली पत्नी भाग्यश्री (वय- 25) आणि मुलगी सरस्वती (वय 4) या दोघींचा गळा आवळून खून केला. त्यानंतर आरोपी स्वतः हून माळाकोळी पोलिस स्टेशनमध्ये हजर झाला आहे. आरोपीने सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय निलपत्रेवार यांच्यासमोर केलेल्या कृत्याची माहिती दिली.
सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय निलपत्रेवार यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत घटनास्थळ गाठले. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले असून उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. माळाकोळी पोलिस पुढील तपास करत आहेत. या दुहेरी हत्याकांडाने कंधार तालुक्यासह संपूर्ण नांदेड जिल्हा हादरला आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी मारुती थोरात, अतिरिक्त पोलिस अविनाश कुमार यांनीही घटनास्थळाला भेट दिली आहे.