बहिणीला त्रास देणाऱ्या मेहुण्याचा खून करून स्वतः केली आत्महत्या
पुणे: बहिणीला त्रास देणाऱ्या मेहुण्याच्या डोक्यात गज मारुन खून करण्यात आल्याची घटना बाणेर भागात मंगळवारी घडली. मेहुण्याचा खून केल्यानंतर तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे
धनंजय साडेकर (वय ३८) असे खून झालेल्याचे नाव आहे. साडेकर यांचा खून केल्यानंतर हेमंत काजळे (वय ४०) याने गळफास घेऊन आत्महत्या केली. बाणेरमधील श्री समृद्धी सोसायटीत ही घटना घडली. धनंजय साडेकर यांचा हेमंत काजळे याच्या बहिणीशी विवाह झाला होता. विवाहानंतर साडेकर दाम्पत्यात वाद झाले. मंगळवारी दुपारी काजळेने साडेकर यांना जाब विचारला. त्यांच्यात वाद झाला. काजळेने साडेकर यांच्या डोक्यात गज मारला. डोक्यात गज मारल्याने साडेकर यांना गंभीर दुखापत झाली. त्यानंतर या घटनेची माहिती काजळेने बहिणीला कळविली. साडेकर राहत असलेल्या सदनिकेत काजळेने गळफास घेऊन आत्महत्या केली.
या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. साडेकर आणि काजळे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारांपूर्वीच दोघांचा मृत्यू झाला होता.