वर्धा येथे देहव्यापार करणाऱ्या टोळीवर पोलिसांचा छापा; नागपूरच्या पीडित महिलेची सुटका, पती-पत्नीला अटक

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

वर्धा: वर्धा येथील कारला रोड परिसरातील नखाते लेआउटमध्ये सुरू असलेल्या एका देहव्यापार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने ४ जुलै २०२६ रोजी धाड टाकली. या कारवाईत एका पीडित महिलेची सुटका करण्यात आली असून, देहव्यापार चालवणाऱ्या पती-पत्नीला पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून ३४,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला गोपनीय माहिती मिळाली होती की, कारला रोडवरील वैष्णवी कॉम्प्लेक्सजवळ राहणारी रूपा नावाची महिला आर्थिक फायद्यासाठी राज्यातील आणि परराज्यातील मुलींना पैशांचे आमिष दाखवून देहव्यापारासाठी प्रवृत्त करते. ती मुलींना स्वतःच्या घरी बोलावून ग्राहकांना पुरवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.



स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख विनोद चौधरी यांनी ही माहिती वर्ध्याचे पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांना दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत गोपनीयता बाळगून पोलिसांनी एक बनावट ग्राहक (पंटर) तयार केला आणि संशयीत घराची खात्री पटवून दिली. पंटरने इशारा करताच पोलिसांनी नखाते लेआउट येथील रूपा गव्हाळे हिच्या घरावर धाड टाकली.

पती-पत्नीला अटक, मुद्देमाल जप्त पोलिसांनी छापा टाकला तेव्हा घरात रूपा दुर्योधन गव्हाळे (वय ३३ वर्षे) आणि तिचा पती गणेश गोविंद महाले (वय ४३ वर्षे) मिळून आले. घराची झडती घेतली असता एका खोलीत बनावट ग्राहक आणि नागपूर येथील एक पीडित महिला देहव्यापार करताना आढळून आले. पीडित महिलेची चौकशी केली असता, रूपा गव्हाळे हिने पैशांचे आमिष दाखवून तिला नागपूरहून वर्ध्याला बोलावले असल्याचे स्पष्ट झाले. तसेच, आरोपी महिला ग्राहकांकडून पैसे घेत असताना, तिचा पती गणेश महाले घराबाहेरील हालचालींवर लक्ष ठेवून असायचा, असे तपासात समोर आले आहे.



पोलिसांनी दोन्ही आरोपींच्या ताब्यातून तीन अँड्रॉइड मोबाईल, ४,५०० रुपये रोख आणि देहव्यापारासाठी लागणारे इतर साहित्य असा एकूण ३४,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

गुन्हा दाखल आणि पुढील कारवाई या प्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध रामनगर पोलीस ठाण्यात (जि. वर्धा) ‘भारतीय न्याय संहिता २०२३’ च्या कलम १४३ (२) आणि ‘अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम १९५६’ च्या कलम ३, ४, ५, ७ नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सुटका करण्यात आलेल्या पीडित महिलेला वर्धा येथील महिला सुधार गृहात दाखल करण्यात आले आहे.



सदर यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल आणि अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, पोलीस उपनिरीक्षक सिनुकुमार बानोत, विजयसिंह गोमलाडु, तसेच पोलीस अंमलदार अमर लाखे, संजयसिंग सुर्यवंशी, चंद्रकांत बुरंगे, संजय राठोड, नितेश मेश्राम, अमोल नगराळे, मंगेश चावरे, नवनाथ मुंडे आणि अल्का कुंभलकर यांच्या पथकाने केली.









WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!