
अमरावती गुन्हे शाखेकडून अवघ्या दोन तासांत खुनाच्या गुन्ह्यातील ३ आरोपींना अटक
दिनांक ४ जुलै २०२६ रोजी रात्री साधारण ११:३० वाजताच्या सुमारास गाडगे नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या विद्याभारती कॉलेजजवळ एका व्यक्तीचा धारदार शस्त्राने भोसकून खून करण्यात आल्याची घटना घडली. जायेद हुसैन खान (वय २८ वर्ष, रा. पाकीजा कॉलनी, अमरावती) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. प्राथमिक माहितीनुसार, आरोपी आणि मृतक यांच्यात झालेल्या तात्कालिक भांडणातून हा खून झाला होता.
पोलीस कारवाई व आरोपींचा थरारक पाठलाग: घटनेची माहिती मिळताच अमरावती पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिली. सुरुवातीला आरोपींविषयी कोणतीही माहिती उपलब्ध नव्हती. मात्र, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल वर आणि दिनेश दहातोडे यांच्या टीमने गोपनीय माहितीच्या आधारे तातडीने आरोपींची ओळख पटवली.

आरोपी त्यांच्या चारचाकी वाहनातून अमरावती शहरातून पळून जाण्याच्या प्रयत्नात होते. पोलिसांनी अमरावतीच्या रस्त्यांवर जवळपास एक तास अत्यंत थरारकपणे त्यांच्या गाडीचा पाठलाग केला आणि अखेर बडनेरा वाय पॉइंट (Y Point) येथून त्यांना वाहनासह ताब्यात घेतले. ही संपूर्ण कामगिरी घटना घडल्यापासून अवघ्या दोन तासांच्या आत करण्यात आली.
ताब्यात घेतलेले आरोपी: १) शेख इम्रान शेख महमुद उर्फ गोलू कुरेशी (वय ३० वर्ष, रा. यवतमाळ, सध्या मुक्काम – यास्मीन नगर, अमरावती)

२) शेख समीर शेख जुम्मन (वय ३२ वर्ष, रा. चिलम छावणी, अमरावती)
३) शेख अमीन शेख जब्बार (वय ३४ वर्ष, रा. राहुल नगर, अमरावती)

आरोपीचा गुन्हेगारी पार्श्वभूमी: प्रमुख आरोपी शेख इम्रान उर्फ गोलू कुरेशी याच्यावर यापूर्वीही यवतमाळ शहरात खुनाचा गुन्हा दाखल असून, तो अनेक वर्षे मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगून आल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.
कारवाई करणारे पोलीस पथक: पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके, श्याम घुगे, प्रांजली सोनवने आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या आणि गाडगेनगर विभागाच्या संपूर्ण पथकाने ही धाडसी कारवाई यशस्वी केली.





