
शेतकऱ्यांचे पंप व इलेक्ट्रिक तारा चोरणारी टोळी जेरबंद; यवतमाळ पोलिसांची धडक कारवाई, १४.७३ लाखांचा मुद्देमाल जप्त
यवतमाळ: स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; शेतातील मोटर व इलेक्ट्रिक तारा चोरणारी टोळी जेरबंद, १४ लाख ७३ हजारांचा मुद्देमाल जप्त
यवतमाळ जिल्ह्यातील वणी आणि पांढरकवडा उपविभागात गेल्या काही दिवसांपासून शेतातील पाण्याच्या मोटर पंपाच्या केबल वायर, मोटर पंप तसेच इलेक्ट्रिक खांबावरील ॲल्युमिनियमच्या जिवंत तारा चोरणाऱ्या टोळीने उच्छाद मांडला होता. या चोऱ्यांचा छडा लावण्यासाठी यवतमाळचे पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी स्थानिक गुन्हे शाखेला आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा वणी/पांढरकवडा पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ता पेंडकर व त्यांचे पथक वणी पोलीस स्टेशन हद्दीत गस्त घालत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली. वणी येथील रंगनाथ नगर जवळील खुल्या मैदानावर काही संशयित व्यक्ती बसून चोऱ्यांचे नियोजन करत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तिथे छापा टाकून ३ संशयितांना ताब्यात घेतले. ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात व पोलीस निरीक्षक सतीश चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ता पेंडकर, पोउपनि धनराज हाके, पोलीस हवालदार सुनील खंडागळे, सुधीर पांडे, सुधीर पिदुरकर, पोलीस शिपाई रजनीकांत मडावी, सलमान शेख आणि चालक पोलीस हवालदार सतीश फुके यांनी पार पाडली.

अटक करण्यात आलेले आरोपी:
१) शेख समीर शेख आमीर (वय २६ वर्षे, रा. रंगनाथ नगर, वणी)

२) सय्यद अली सय्यद गुलाब (वय ३७ वर्षे, रा. रंगनाथ नगर, वणी)
३) एक विधी संघर्षग्रस्त बालक (वय १७ वर्षे)

सुरुवातीला त्यांनी पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली, परंतु पोलिसी खाक्या दाखवताच आरोपी शेख समीर याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपींनी त्यांचा ड्रायव्हर दीपक याच्या मदतीने सचिन गेडाम यांच्या मालवाहू वाहनाचा (क्रमांक MH/34/BZ/6522) वापर करून पांढरकवडा, राळेगाव, पाटण, मारेगाव, मुकुटबन आणि पारवा पोलीस स्टेशन हद्दीतून मोठ्या कटरच्या साहाय्याने इलेक्ट्रिक तारा व मोटर पंप चोरल्याचे कबूल केले. चोरी केलेला माल त्यांनी शास्त्री नगर, वणी येथील भंगार दुकानदार निसार खान याला विकल्याचे सांगितले.
त्यावरून पोलिसांनी वणी येथील घोन्सा टी-पॉईंट जवळ सापळा रचून भंगार दुकानदार निसारउद्दीन खान जलालुद्दीन खान (वय ५२ वर्षे, रा. शास्त्री नगर, वणी) याला मालवाहू गाडीसह (क्रमांक MH/29/BE/8442) ताब्यात घेतले. त्याच्या गाडीतून चोरीचा १११० किलो ॲल्युमिनियम वायर जप्त करण्यात आला. तसेच मुख्य आरोपी शेख समीर याच्या घराच्या मोकळ्या जागेतून चोरीच्या केबल्स जाळून काढलेला तांबे व सबमर्सिबल मोटर जप्त करण्यात आली. या कारवाईमुळे विविध पोलीस ठाण्यांतर्गत दाखल असलेले एकूण १० चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

जप्त करण्यात आलेला मुद्देमाल (एकूण किंमत रु. १४,७३,०००/-):
-
ॲल्युमिनियम तार: वजन अंदाजे १११० किलो – किंमत रु. ३,३०,०००/-
-
तांब्याची तार (केबल जाळून काढलेली): वजन १४ किलो – किंमत रु. २४,०००/-
-
सबमर्सिबल पाण्याच्या मोटर: ०१ नग – किंमत रु. १४,०००/-
-
चोरीचा माल नेणारे मालवाहू वाहन (MH/29/BE/8442): किंमत रु. ५,००,०००/-
-
चोरीत वापरलेले मालवाहू वाहन (MH/34/BZ/6522): किंमत रु. ६,००,०००/-
-
तार कापण्याचे कटर (चिमटा): ०१ नग – किंमत रु. ५,०००/-




