
एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणारा आरोपी इंदूरमधून अटकेत; 5.05 लाखांचा मुद्देमाल जप्त
बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धानोरा येथील महाराष्ट्र बँकेच्या एटीएममध्ये चोरीचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मध्यप्रदेशातील इंदूर येथून अटक केली आहे. या कारवाईत गुन्ह्यात वापरलेली कार व मोबाईल असा एकूण 5 लाख 5 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महेश कैलास बुरसे (वय 29, रा. सेनगाव, जि. हिंगोली, सध्या गजानन नगरी, मलकापूर) यांनी मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. 15 जून 2026 रोजी पहाटे सुमारे 3.36 वाजण्याच्या सुमारास धानोरा येथील महाराष्ट्र बँकेच्या एटीएममध्ये दोन अज्ञात व्यक्तींनी तोंडाला रुमाल बांधून आणि हातात लोखंडी रॉड घेऊन प्रवेश केला. त्यांनी एटीएम मशीन फोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला तसेच मशीनचे नुकसानही केले.

या प्रकरणी मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी आरोपींचा शोध घेऊन गुन्ह्याची उकल करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले. त्यानुसार पोलीस निरीक्षक आशिष रोही यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र पथके तयार करून तपास सुरू करण्यात आला.
तपासादरम्यान 16 जून रोजी स्थानिक गुन्हे शाखेला गोपनीय माहिती मिळाली की, एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणारे आरोपी इंदूर (मध्यप्रदेश) येथील असून ते पळून जाण्याच्या तयारीत आहेत. मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने तातडीने इंदूर येथे धाडसी कारवाई करत जावेद अयुब खान (वय 38, रा. कबुतरखाना, इंदूर) याला ताब्यात घेतले.

चौकशीदरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेली मारुती एर्टिगा कार (क्रमांक MP-09-WB-3237) किंमत 5 लाख रुपये आणि एक मोबाईल फोन किंमत 5 हजार रुपये असा एकूण 5 लाख 5 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.






