
वर्धा पोलीसांच्या वायफड येथील ‘वॉश आउट’ मोहिमेत १४ लाखांची अवैध दारू जप्त, ४ जणांवर गुन्हे दाखल
वर्धा पोलिसांची वायफड पारधी बेड्यावर मोठी कारवाई: ‘वॉश आउट’ मोहिमेत १४ लाखांपेक्षा जास्त किमतीचा अवैध दारूसाठा व साहित्य जप्त; ४ जणांवर गुन्हे दाखल
पुलगाव: पुलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध व्यावसायिक आणि दारू माफियांविरुद्ध वर्धा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. १४ जुलै २०२६ रोजी राबवण्यात आलेल्या विशेष ‘वॉश आउट’ मोहिमेदरम्यान पोलिसांनी वायफळ बेडा परिसरात छापा टाकून १४ लाख १६ हजार ५०० रुपये किमतीचा अवैध दारूसाठा आणि दारू तयार करण्याचे साहित्य जप्त केले आहे. या प्रकरणी चार आरोपींविरुद्ध दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलीस स्टेशन पुलगावच्या हद्दीतील वायफळ पारधी बेडा येथे मोठ्या प्रमाणावर अवैध रित्या गावठी दारूची निर्मिती केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी १४ जुलै रोजी ‘वॉश आउट’ मोहीम राबवून या परिसरात अचानक छापा टाकला. या छाप्यादरम्यान गावठी मोहाची भट्टी लावून दारू तयार केली जात असल्याचे उघडकीस आले. सदरची धडक कारवाई पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी महाडीक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

१४ लाखांचा मुद्देमाल जप्त: पोलिसांनी घटनास्थळावरून गावठी मोहा दारूसाठी लागणारा कच्चा मोहा रसायन सडवा, सडवा तयार करण्यासाठी लागणारे साहित्य, तयार गावठी मोहा दारू, तसेच दारू निर्मितीसाठी लागणारे प्लास्टिक आणि लोखंडी ड्रम असा एकूण १४,१६,५००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. हा संपूर्ण मुद्देमाल आरोपी चरणसिंग उर्फ काल्या भोसले, सरनेनसिंग सरनान चव्हाण, अंजीत चव्हाण आणि वर्षा भोसले (सर्व रा. वायफळ पारधी बेडा) यांच्या घराजवळ मिळून आला. या चारही आरोपींविरुद्ध पुलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वनविभागाकडूनही कारवाई: दारूभट्टी तयार करण्यासाठी आरोपींनी जंगलातील लाकडांचा वापर केला होता. ही बाब निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ घटनास्थळी पाचारण केले. शेड्युलमध्ये असलेली जंगली लाकडे आणि संबंधित साहित्य वनविभागाने आपल्या ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडूनही पुढील कायदेशीर कारवाई केली जात आहे.

यांच्या मार्गदर्शनात झाली कामगिरी:
या मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखा वर्धाचे पोलीस निरीक्षक चौधरी, पुलगावचे पोलीस निरीक्षक सदाशिव ढाकणे, पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर राय, शहाजी घोडके, विनोद वानखेडे, देवळीचे पोलीस उपनिरीक्षक गजभिये, पोलीस उपनिरीक्षक सिनुकुमार बानोत, स्थानिक गुन्हे शाखा वर्धा व पुलगाव, अल्लीपूर येथील पोलीस अधिकारी, अंमलदार तसेच दंगल नियंत्रण पथकाने सहभाग घेतला होता.






