
गोष्ट एका अशाही सन्मानाची……….ठाणेदार मंगेश भोयर यांच्या तळेगांव पोलीस ठाण्यात एक अशीही ऐतिहासिक नोंद
तळेगाव पोलीस ठाण्यात ठाणेदार मंगेश भोयर यांचा अनोखा उपक्रम: सेवानिवृत्त होणाऱ्या उपनिरीक्षकांचा सन्मान करत उकंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण
तळेगाव: तळेगाव पोलीस ठाणे हे केवळ कायदा व सुव्यवस्था राखण्यापुरते मर्यादित न राहता, सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रमांद्वारे नेहमीच नागरिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आले आहे. असाच एक कौतुकास्पद आणि भावूक प्रसंग १५ ऑगस्ट, स्वातंत्र्य दिनानिमित्त ग्रामस्थांनी पुन्हा एकदा अनुभवला.

राष्ट्रीय ध्वजाचे ध्वजारोहण करणे ही अतिशय अभिमानाची आणि सन्मानाची बाब मानली जाते. नियमानुसार हा मान संस्थेच्या किंवा ठाण्याच्या प्रमुखाचा असतो. मात्र, स्वातंत्र्य दिनानिमित्त तळेगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार मंगेश भोयर यांनी स्वतः ध्वजारोहण न करता, हा सर्वोच्च मान ठाण्यातील दुय्यम अधिकारी तथा ऑक्टोबर २०२६ मध्ये सेवानिवृत्त होत असलेले पोलीस उपनिरीक्षक उकंडे यांना दिला. ठाणेदारांच्या या निर्णयाने उपस्थित ग्रामस्थ अवाक झाले आणि पोलीस दलातील या अनोख्या माणुसकीचे सर्वांनी मनापासून कौतुक केले.
माणुसकीची आणि परंपरेची पुनरावृत्ती
ठाणेदार मंगेश भोयर यांनी असा सन्मान देण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही त्यांनी खाकी वर्दीतील माणुसकीचे दर्शन घडवत:

-
महाराष्ट्र दिन: निवृत्त झालेले पोलीस अंमलदार प्रभाकर दुधाट यांच्या हस्ते ध्वजारोहण केले.
-
प्रजासत्ताक दिन: सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक शाम सोनपरोते यांना ध्वजारोहणाचा मान दिला.

आपल्या सहकाऱ्यांच्या प्रदीर्घ सेवेचा गौरव करण्याची ही अनोखी परंपरा त्यांनी तळेगाव पोलीस ठाण्यात सुरू केली आहे.
“आयुष्यातील सर्वात मोठा सन्मान” – पोउपनि उकंडे
ध्वजारोहणानंतर आपले मनोगत व्यक्त करताना पोलीस उपनिरीक्षक श्री. उकंडे भावूक झाले. “सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असताना राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करायला मिळणे, हा आजवर केलेल्या पोलीस सेवेतील सर्वात मोठा सन्मान आहे. ही आठवण माझ्या आयुष्यात सदैव स्मरणात राहील,” अशा भावना व्यक्त करत त्यांनी ठाणेदार मंगेश भोयर यांचे मनापासून आभार मानले.

ठाणेदारांच्या या संवेदनशील निर्णयामुळे पोलीस दलातील अंतर्गत बंधुभाव तर वाढलाच, शिवाय ‘खाकी वर्दी’मागे दडलेली एक संवेदनशील माणुसकी पुन्हा एकदा ग्रामस्थांच्या अनुभवास आली.




