गांजा विक्रीचा डाव उधळला! हिंगणघाट पोलिसांची धडक कारवाई, एक जण अटकेत

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

हिंगणघाट पोलिसांची धडक कारवाई: ३८२ ग्रॅम गांजासह २४,४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त; राहुल दानवला अटक

हिंगणघाट (वर्धा):

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी गस्त घालत असताना, हिंगणघाट पोलिसांच्या गुन्हे प्रगटीकरण पथकाने (DB Team) एका घरावर छापा मारून अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या एका युवकाला अटक केली आहे. आरोपीकडून ३८२ ग्रॅम गांजा आणि भ्रमणध्वनी असा एकूण २४,४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.



नेमकी घटना काय?

हिंगणघाट पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रगटीकरण पथकाचे पोलीस हवालदार प्रशांत ठोंबरे व त्यांचे सहकारी परिसरात पेट्रोलिंग करत होते. दरम्यान, खबरऱ्यामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की, खंडोबा वॉर्ड, हिंगणघाट येथील रहिवासी राहुल दानव हा आपल्या राहत्या घरी गांजा नावाचा अमली पदार्थ विक्रीच्या उद्देशाने बाळगून आहे. त्याने पांढऱ्या रंगाचा डिझाईनचा शर्ट आणि काळ्या रंगाची पॅन्ट परिधान केली असल्याची अचूक माहिती पोलिसांना मिळाली.

मिळालेल्या बातमीच्या आधारे, तात्काळ उपविभागीय पोलीस अधिकारी  सुशीलकुमार नायक यांना माहिती देण्यात आली. त्यांच्या सूचनेनुसार, पोलीस निरीक्षक अनिल राऊत, पोलीस कर्मचारी, स्वतंत्र पंच, मापारी (वजन करणारा) आणि फॉरेन्सिक टीमसह राहुल दानव याच्या घरावर छापा टाकला.



घरझडतीत गांजा व मोबाईल हस्तगत

पोलिसांनी पंचांसमक्ष संशयित इसमाला ताब्यात घेऊन त्याची विचारपूस केली असता, त्याने आपले नाव राहुल सुभाष दानव (वय २१ वर्ष, रा. खंडोबा वार्ड, हिंगणघाट, जि. वर्धा) असे सांगितले.

त्यानंतर त्याच्या घराची कायदेशीररित्या झडती घेतली असता, घरातील लोखंडी कपाटात खालील साहित्य मिळून आले:



  1. गांजा (अमली पदार्थ): एका पांढऱ्या प्लास्टिक पिशवीत हिरवट-काळपट रंगाची पाने, फुले, देठ, कळ्या व बिया असलेला ओलसर गांजा (पिशवीसह एकूण वजन: ३८२ ग्रॅम, अंदाजे किंमत: ₹९,४००/-).

  2. मोबाईल: एक जुना वापरता ‘व्हिव्हो’ (Vivo) कंपनीचा मोबाईल (अंदाजे किंमत: ₹१५,०००/-).



एकूण २४,४०० रुपये किमतीचा मुद्देमाल पंचांसमक्ष जप्ती पंचनामा करून आणि फॉरेन्सिक टीमच्या मदतीने जप्त करण्यात आला.

गुन्हा दाखल व आरोपीला अटक

या प्रकरणी आरोपी राहुल सुभाष दानव याच्याविरुद्ध पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे एन.डी.पी.एस. ॲक्ट (NDPS Act) अन्वये गुन्हा नोंदवून त्याला अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक (API) अतुल स्थूल करत आहेत.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनात यशस्वी कारवाई

सदरची धडक कारवाई:

  • सौरभ कुमार अग्रवाल ( पोलीस अधीक्षक, वर्धा)

  •  सदाशिव वाघमारे (अप्पर पोलीस अधीक्षक)

  •  सुशीलकुमार नायक (उपविभागीय पोलीस अधिकारी, हिंगणघाट)

यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक अनिल राऊत यांच्या नेतृत्वात, डी.बी. पथकाचे पोलीस हवालदार प्रशांत ठोंबरे, पो.ना. राजेश शेंडे, पो.शि. आशिष नेवारे, पो.शि. मंगेश वाघमारे, आणि पो.शि. रोहित साठे यांनी पार पाडली.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!