धुळे-नाशिक मंदिर चोरीचा पर्दाफाश: मध्य प्रदेशातील २ चोरटे गजाआड; ७.८३ लाखांचा मुद्देमाल जप्त

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

धुळे-नाशिक मंदिर चोरीचा पर्दाफाश: मध्य प्रदेशातील २ सराईत चोरटे जेरबंद; ४.१९९ किलो चांदीसह ७.८३ लाखांचा मुद्देमाल जप्त

विशेष प्रतिनिधी (गणेश शेंडे), धुळे:

धुळे आणि नाशिक जिल्ह्यातील विविध मंदिरांमध्ये घरफोडी आणि दानपेटी फोडून आभूषणे लांबवणाऱ्या मध्य प्रदेशातील एका सराईत टोळीचा शिरपूर शहर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या धडाकेबाज कारवाईत दोन सराईत आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून ४ किलो १९९ ग्रॅम वजनाची चांदीची आभूषणे, रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली हत्यारे असा एकूण ७ लाख ८३ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.



या कारवाईमुळे धुळे, शिरपूर, मालेगाव आणि सटाणा परिसरातील मंदिर चोरीचे तब्बल ६ गुन्हे उघडकीस आले आहेत.

घटनेची पार्श्वभूमी आणि पोलीस तपास

दिनांक ३० जून २०२६ च्या रात्री ९ वाजेपासून १ जुलै २०२६ च्या सकाळी ७ वाजेच्या दरम्यान, सावळदे (ता. शिरपूर) येथील प्रसिद्ध दत्त मंदिराची दानपेटी फोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे २२ ते २५ हजार रुपयांची रोख रक्कम लांबवली होती. याप्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.



गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने तात्काळ तपासाची चक्रे फिरवली.

  • सीसीटीव्ही फुटेजची तपासणी: घटनास्थळ व परिसरातील विविध सीसीटीव्ही फुटेजचे बारीक निरीक्षण करण्यात आले.



  • गोपनीय बातमीदार सक्रिय: तांत्रिक विश्लेषण आणि बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयित आरोपी मध्य प्रदेशातील असल्याचे निष्पन्न झाले.

  • मध्य प्रदेशात धाडसत्र: पोलिसांच्या विशेष पथकाने मध्य प्रदेशातील संवेदनशील भागात गुप्तपणे मोहीम राबवून दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले.



 अटक करण्यात आलेले आरोपी

१. सदीम गिलदार देवका (वय २७ वर्षे, रा. मध्य प्रदेश)

२. भिकला रामसिंग देवका (वय ३९ वर्षे, रा. मध्य प्रदेश)

पोलीस कोठडीदरम्यान खाकीचा दाखवताच आरोपींनी सावळदे येथील दत्त मंदिरातील चोरीची कबुली दिली. अधिक चौकशीत त्यांनी शिरपूर शहरासह धुळे, मालेगाव आणि सटाणा परिसरातील मंदिरांमध्ये व बंद घरांमध्ये केलेल्या चोरीची कबुली दिली.

 जप्त करण्यात आलेला मुद्देमाल (एकूण किंमत: ₹७,८३,४००)

अ.क्र. मुद्देमालाचा तपशील वजन / प्रमाण
चांदीचा घडा १,१३१ ग्रॅम
चांदीचे घोडे ८२० ग्रॅम
चांदीचे मुकुट (५ नग) १,२६९ ग्रॅम
चांदीच्या पाटल्या (३ नग) ६०१ ग्रॅम
इतर आभूषणे (कडे, जोडवे, ब्रेसलेट, चैन, हार, छत्री, नाग इ.) ३५१ ग्रॅम
एकूण चांदी ४.१९९ किलोग्रॅम
रोख रक्कम, लोखंडी हत्यारे व गुन्ह्याचे साहित्य

उघडकीस आलेले ६ प्रमुख गुन्हे

या अटकेमुळे धुळे व नाशिक जिल्ह्यातील खालील पोलीस ठाण्यांत दाखल असलेले चोरी व घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत:

  1. सावळदे (शिरपूर) – दत्त मंदिर दानपेटी चोरी

  2. धुळे शहर – रोकडोबा हनुमान मंदिर परिसरातील श्रीराम मंदिर चोरी

  3. शिरपूर शहर – बंद घरातील घरफोडी

  4. सावळदे परिसर – झोपडीतील चोरी

  5. मालेगाव परिसर – मंदिर चोरी

  6. सटाणा परिसर – मंदिर चोरी

 तपास पथक व मार्गदर्शक अधिकारी

ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

प्रत्यक्ष कारवाईत पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी, पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र महाजन यांच्यासह शिरपूर शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकातील अधिकारी व अंमलदारांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली. शिरपूर पोलिसांच्या या धडाकेबाज कामगिरीचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!