
बेलतरोडी पोलिसांची कामगिरी: घरफोडी व वाहन चोरी करणाऱ्या आरोपीला अटक
नागपूर:
बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने धडक कारवाई करत बेसा परिसरात घरफोडी करणारा आणि विविध भागांतून वाहने व मोबाईल लांबवणारा सराईत गुन्हेगार नीरज प्रभाकर उईके याला अटक केली आहे. आरोपीकडून चोरीचे २ दुचाकी वाहने, १ मोबाईल आणि रोख रकमेसह एकूण ५०,७०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, त्याच्या अटकेमुळे नागपुरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील एकूण ४ गुन्हे उघडकीस आले आहेत.

मध्यरात्री खिडकीची ग्रील तोडून बेसा येथे घरफोडी
दिनांक ०७ जुलै २०२६ रोजी पहाटे सुमारे ०२:३० वाजताच्या सुमारास, प्लॉट नं. ६८, संस्कृती सोसायटी, बेसा (नागपूर) येथील रहिवासी अविनाश मधुकर दुर्योधन (वय ४५) हे आपल्या कुटुंबासह घरात झोपलेले होते. यावेळी चोरट्याने संधी साधून किचनच्या खिडकीची लोखंडी ग्रील तोडून आत प्रवेश केला. घरातील लाकडी आलमारी उघडून त्यातील दोन लेडीज पर्स व एका जेंट्स पर्समधून १५,००० रुपयांची रोख रक्कम चोरून आरोपीने पळ काढला होता. याप्रकरणी बेलतरोडी पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा नोंदवण्यात आला होता.

३० ते ४० ठिकाणच्या CCTV फुटेजवरून आरोपी निष्पन्न
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन बेलतरोडी पोलिसांच्या विशेष तपास पथकाने घटनास्थळ व परिसरातील सुमारे ३० ते ४० ठिकाणचे CCTV फुटेज बारकाईने तपासले. पोलीस खबऱ्यांकडून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपी नीरज प्रभाकर उईके (वय २४ वर्ष, रा. चांगदेव नगर झोपडपट्टी, खामला, प्रतापनगर, नागपूर) याला ताब्यात घेतले.

चौकशीत ४ गुन्ह्यांची कबुली
पोलीस ठाण्यात आणून कसून चौकशी केली असता आरोपीने बेसा येथील घरफोडीसह शहरात इतर ठिकाणी केलेले चोरीचे गुन्हे कबूल केले:

-
मनीष नगर मोबाईल चोरी: हॉटेल अशोका, मनीष नगर येथून १०,००० रुपये किमतीचा ‘वन प्लस’ (OnePlus) कंपनीचा मोबाईल लांबवला.
-
बेसा घरफोडी: संस्कृती सोसायटीतील घरातून १५,००० रुपयांची रोख रक्कम चोरली.
-
रामटेके नगर (अजनी हद्द): रामटेके नगर येथून २०,००० रुपये किमतीची स्प्लेंडर बाईक (क्र. MH 31 WS 6174) लांबवली.
-
प्रतापनगर हद्द: प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून मोपेड ॲक्टिव्हा गाडी (क्र. MH 31 DG 8273) लांबवली.
५०,७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त
आरोपीच्या ताब्यातून पोलिसांनी ०१ वन प्लस मोबाईल, ७०० रुपयांची रोकड आणि चोरीच्या २ दुचाकी (स्प्लेंडर व ॲक्टिव्हा) असा एकूण ५०,७०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, सह पोलीस आयुक्त नविनचंद्र रेड्डी, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप आयुक्त श्रीमती रश्मिता राव (परिमंडळ ४) आणि सहाय्यक पोलीस आयुक्त नरेंद्र हिवरेबेलतरोडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रितेश आहेर, पोलीस उपनिरीक्षक किशोर मालोकर, रविकांत भदाणे, पोलीस हवालदार सुहास शिंगणे, सुमेंद्र बोपचे, सचिन लाचरवार आणि पोलीस अंमलदार विवेक श्रीपाद यांनी पार पाडली.
मामल्याचा पुढील सखोल तपास बेलतरोडी पोलीस करत आहेत.




