
गडचिरोलीत सोन्या-चांदीच्या दागिन्यांच्या जबरी चोरीचा प्रयत्न: ३ आरोपींना २४ तासांत अटक, १ फरार
गडचिरोली :-
गडचिरोली ते चामोर्शी रोडवरील जंगल सोसायटी ऑफिसजवळ सराफा व्यापाऱ्याला अडवून त्याच्या चेहऱ्यावर लाल मिरचीची पावडर फेकून दागिन्यांची जबरी चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ३ आरोपींना गडचिरोली पोलिसांनी अवघ्या २४ तासांच्या आत अटक केली आहे. २ सप्टेंबर २०२६ रोजी पोलिसांनी ही कारवाई केली असून न्यायालयाने आरोपींना २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

घटनेचा तपशील:
३१ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ऐश्वर्या ज्वेलरी शॉपचे मालक सुरेश बाबूराव भोजापुरे (वय ५० वर्षे, रा. गडचिरोली) हे दुकान बंद करून मोटारसायकलवरून घरी जात होते. गडचिरोली-चामोर्शी रोडवर डबल सीट आलेल्या अज्ञात मोटारसायकलस्वारांनी त्यांना अडवले आणि त्यांच्या चेहऱ्यावर मिरची पावडर फेकून डब्याने मारहाण केली व दागिने पळवण्याचा प्रयत्न केला. फिर्यादीने आरडाओरड केल्यामुळे आरोपींनी अंधाराचा फायदा घेऊन पळ काढला. याप्रकरणी १ सप्टेंबर २०२६ रोजी पोलीस ठाणे गडचिरोली येथे गुन्हा दाखल करण्यात आला.

अटक करण्यात आलेले आरोपी:
१. विशाल घनश्याम देशमुख (वय ३६ वर्षे, रा. रामनगर, गडचिरोली)

२. राकेश विजय गिरसावळे (वय ३५ वर्षे, रा. कन्नमवार नगर, गडचिरोली)
३. शहबाज सलाम शेख (वय ३१ वर्षे, रा. विवेकानंद नगर, गडचिरोली)

फरार आरोपी:
-
सोनु खांडेकर (वय २४ वर्षे, रा. विवेकानंद नगर, गडचिरोली)
पोलीस कारवाई:
पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली व सहा. पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखा आणि पोलीस स्टेशन गडचिरोलीच्या पथकांनी तांत्रिक पुरावे व गुप्त माहितीच्या आधारे शहरातून ३ आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान चौथ्या आरोपीचे नाव समोर आले असून त्याचा शोध सुरु आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण बुंदे करत आहेत.




