
नागपूर गुन्हे शाखा युनिट क्र. ३ची कारवाई; घरफोडीचे दोन गुन्हे उघडकीस
नागपूर : गुन्हे शाखा युनिट क्र. ३च्या पथकाने तांत्रिक तपास व गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई करत घरफोडीचे दोन गुन्हे उघडकीस आणले आहेत. या कारवाईत तीन आरोपी आणि एका विधिसंघर्षग्रस्त बालकाची माहिती समोर आली असून, चोरीचा मुद्देमाल व गुन्ह्यात वापरलेले वाहन जप्त करण्यात आले आहे.
दिलेल्या पोलिस प्रसिद्धीपत्रकानुसार, फिर्यादी इमरान शेख (वय ३५) हे एच.पी. गॅस गोदाम, तोहिद नगर, नागपूर येथे राहतात. सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील क्वार्टर परिसरात त्यांची ‘मिकी पान पॅलेस’ नावाची पानटपरी आहे. २६ जून २०२६ रोजी रात्री १० ते २७ जून रोजी पहाटे ४ वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने पानटपरीचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. दुकानातील सिगारेट व पानमसाल्यासह अंदाजे ₹१,२२५ किमतीचा मुद्देमाल चोरीला गेला.

फिर्यादीच्या तक्रारीवरून सक्करदरा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
तांत्रिक तपासातून आरोपींचा शोध
गुन्ह्याचा समांतर तपास करताना गुन्हे शाखा युनिट क्र. ३च्या तपास पथकातील अधिकारी व अंमलदारांनी तांत्रिक तपास केला. मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली.

चौकशीत:
- पियुष उर्फ डिजे निलेश सोनटक्के (वय १९), विनोबा भावे नगर, यशोधरा नगर, नागपूर
- मोहम्मद जिशान अन्सारी (वय १८), कुंदनलाल गुप्ता नगर, नागपूर
- एक विधिसंघर्षग्रस्त बालक
यांच्याकडून पानटपरी फोडीच्या गुन्ह्याबाबत माहिती मिळाली.

तपासादरम्यान त्यांचा साथीदार वृत्तांत दीपक द्विवेडकर (वय २२), विनोबा भावे नगर, यशोधरा नगर, नागपूर याचाही सहभाग निष्पन्न झाला.
आणखी एका घरफोडीची कबुली
आरोपी क्रमांक ४ वृत्तांत द्विवेडकर याच्याकडे अधिक चौकशी केली असता, त्याने नमूद गुन्ह्याव्यतिरिक्त कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत आणखी एका घरफोडीचा गुन्हा केल्याचे सांगितले. त्यामुळे या कारवाईत एकूण दोन घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

आरोपीच्या ताब्यातून रोख ₹३,००० तसेच गुन्हा करताना वापरलेली सीडी डिलक्स मोटारसायकल (एमएच-३१ सीरीज) असा एकूण अंदाजे ₹२८,००० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणातील पुढील तपास सुरू असून, आरोपींकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येतात का, याबाबत पोलिसांकडून चौकशी केली जात आहे. नागपूर शहर पोलिसांच्या विशेष पथकांकडून तांत्रिक तपासाच्या माध्यमातून मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. नागपूर पोलिसांच्या अधिकृत संकेतस्थळावर गुन्हे शाखेसह विशेष पथकांची माहिती उपलब्ध आहे.
मार्गदर्शन : ही यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, सह पोलीस आयुक्त नविनचंद्र रेड्डी, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसअपर पोलीस आयुक्त (गुन्हे) राजेंद्र दाभाडे, पोलीस उपआयुक्त (डिटेक्शन) दीपक अमृवाल, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हेशाखा) वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्र. ३चे पोलीस निरीक्षक अतुल मोहनकर व त्यांच्या पथकातील अधिकारी-अंमलदारांनी ही कारवाई केली.




