गोवंश तस्करांना दणका; परभणी LCB कडून २३ बैलांची सुटका, २२.१५ लाखांचा मुद्देमाल जप्त

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow


परभणीत स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई: गोवंशाची अवैध वाहतूक उघड; २२.१५ लाखांचा मुद्देमाल जप्त, २३ गोवंशाची सुटका

परभणी

जिल्ह्यात गोवंशाची अवैध वाहतूक करणाऱ्या तस्करांवर परभणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि पालम पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवत एका आयशर कंटेनरमधून कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २३ गोवंशाची सुटका केली आहे. या कारवाईत तब्बल २२ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, याप्रकरणी पालम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कारवाईचा घटनाक्रम व सविस्तर माहिती:

मा. पोलीस अधीक्षक  पंकज कुमावत आणि अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात गोवंशाची अवैध वाहतूक रोखण्यासाठी विशेष मोहीम सुरू आहे.

दिनांक ११ नोव्हेंबर २०२६ रोजी पहाटे १२:३० वाजण्याच्या सुमारास पालम ते मुरडसगाव ते माळेगाव जाणाऱ्या रोडवर, मौजे चाटोरी येथील जय महाराष्ट्र हॉटेलसमोर एक आयशर कंटेनर (क्रमांक MH 40 AK 8673) संशयास्पदरीत्या उभा असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.



पोलीस पथकाने तात्काळ कंटेनरची झडती घेतली असता, त्यामध्ये अत्यंत क्रूरपणे, निष्काळजीपणे आणि दाटीवाटीने २३ बैल कोंबून भरल्याचे निष्पन्न झाले. या अमानुष वाहतुकीमुळे यातील ०२ बैल जागीच मयत झाले होते, तर ०२ बैल गंभीर जखमी झाले होते. हे सर्व बैल कत्तलीसाठी अवैधरीत्या नेले जात असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.



जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाचा तपशील:

या कारवाईत पोलिसांनी वाहनासह मुक जनावरांचा ऐवज जप्त केला आहे:



  1. आयशर कंटेनर: (पासिंग क्र. MH 40 AK 8673, चेसिस क्र. MC2K1MRF0GJ053888) – किंमत १५,००,०००/- रुपये.

  2. जनावरे: एकूण २३ बैल (२१ जिवंत, २ मयत) – किंमत ७,१५,000/- रुपये.



  • एकूण जप्त मुद्देमाल: २२,१५,०००/- रुपये.

सुटका करण्यात आलेल्या सर्व जिवंत गोवंशाला सुरक्षितपणे पुढील संगोपनासाठी नजीकच्या गोशाळेत पाठविण्यात आले आहे.



दाखल गुन्ह्याचे कलम:

या प्रकरणी पालम पोलीस ठाण्यात विविध कठोर कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे:

  • पो.स्टे. पालम गु.र.नं.: ५१९/2026

  • कलमे: महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ चे कलम प्राण्यास क्रूरपणे वागविण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० चे कलम  प्राण्यांचे परिवहन अधिनियम १९७८ चे कलम  भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम ३(५) नुसार गुन्हा नोंदवला आहे.

आरोपी आणि तपास:

गुन्ह्यात आयशर कंटेनरचा चालक आणि त्याच्यासोबत असलेला एक अनोळखी इसम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस सध्या फरार आरोपींचा कसून शोध घेत आहेत.

ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक पंकज कुमावत (IPS), अपर पोलीस अधीक्षक  तानाजी चिखले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे, पोलीस उपनिरीक्षक  चंदनसिंह परिहार, पोलीस अंमलदार केशवराज लटपटे, लक्ष्मण कागणे आणि पालम पोलीस ठाण्याच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!