
बुलढाणा पोलीस विशेष बातमी: ‘मिशन परिवर्तन’ अंतर्गत शेगाव ग्रामीणमध्ये मोठी कारवाई

बुलढाणा (दिनांक १८ ऑक्टोबर २०२६):
जिल्ह्यात अंमली पदार्थांचे जाळे उद्ध्वस्त करण्यासाठी पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या ‘मिशन परिवर्तन’ या विशेष मोहिमेला पुन्हा एकदा मोठे यश आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या (L.C.B.) पथकाने शेगाव ते खामगाव मार्गावर केलेल्या धडक कारवाईत तब्बल २० किलो ५६० ग्रॅम गांजा बाळगणाऱ्या दोघा जणांना बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणी पोलिसांनी गांजा आणि वाहनांसह एकूण १० लाख ९६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

कारवाईची पार्श्वभूमी आणि गोपनिय माहिती:
बुलढाणा जिल्ह्यात अंमली पदार्थांची वाहतूक, साठवणूक, उत्पादन व विक्री करणाऱ्या समाजकंटकांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांचे एक स्वतंत्र पथक तयार करून त्यांना विशेष सूचना देण्यात आल्या होत्या.

दरम्यान, आज दिनांक १८ ऑक्टोबर २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय बातमी मिळाली की, शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील शेगाव-खामगाव रोडवरील ग्राम सवर्णा शिवारातील ‘यश ढाब्या’जवळ काही इसम बेकायदेशीरपणे गांजा विक्रीच्या उद्देशाने आले आहेत.

छापा आणि जप्त करण्यात आलेला मुद्देमाल:
मिळालेल्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पंचांसमक्ष तात्काळ सदर ठिकाणी छापा टाकला. यावेळी दोन व्यक्ती संशयास्पदरीत्या गांजा बाळगताना आढळले. पोलिसांनी पंचांसमक्ष त्यांची झडती घेतली असता त्यांच्या ताब्यातून खालीलप्रमाणे मुद्देमाल जप्त करण्यात आला:
-
अमली पदार्थ (गांजा): वजन २० किलो ५६० ग्रॅम (किंमत अंदाजे १०,२६,०००/- रुपये)

-
मोपेड (अॅक्सीस कंपनी, क्र. MH-28-BY-3169): किंमत २५,०००/- रुपये
-
मोटरसायकल (कावासकी बॉक्सर, क्र. MH-30-K-9884): किंमत २५,०००/- रुपये

-
मोबाईल फोन (दोन नग): किंमत २०,०००/- रुपये
-
एकूण जप्त मुद्देमाल मूल्य: १०,९६,०००/- रुपये
ताब्यात घेण्यात आलेले आरोपी:
घटनास्थळावरून पोलिसांनी खालील दोन आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे:
-
हुसेन खान युसूफ खान (वय २५ वर्षे, रा. वार्ड नं. १२, शेगांव)
-
आसिफ खान एजान खान (वय २९ वर्षे, रा. ईदगाह प्लॉट, शेगांव, ता. शेगांव, जि. बुलढाणा)
गुन्हा दाखल व पुढील तपास:
सदर प्रकरणातील आरोपींविरुद्ध शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये अमली औषधीद्रव्ये व मनःप्रभावी पदार्थ अधिनियम नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास शेगाव ग्रामीण पोलीस करीत असून, या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा कसून शोध घेतला जात आहे.
पोलीस पथकाची उल्लेखनीय कामगिरी:
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशानुसार, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड (बुलढाणा) व अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप (खामगाव) यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत ठाकरे यांच्या नेतृत्वात खालील अंमलदार व अधिकाऱ्यांच्या पथकाने पार पाडली:
-
सपोनि. यशोदा कणसे
-
पोहेकॉ. राजेंद्र टेकाळ, अनुपकुमार मेहेर, विजय वारुळे
-
पोकॉ. मंगेश सनगाळे, अमोल वनारे, मनोज खरडे, सतीश नाटेकर
-
चालक सफौ. विकास देशमुख, चापोहेकॉ. समाधान टेकाळे
-
पोकॉ. कैलास ठोंबरे




