हिंगणघाट अपहरण व खंडणी प्रकरण: २४ तासांत आरोपी जेरबंद

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow


वर्धा:

हिंगणघाट पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या एका खळबळजनक अपहरण व खंडणी प्रकरणाचा वर्धा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या २४ तासांच्या आत यशस्वी उलगडा केला आहे. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी नागपूर, पुलगाव आणि अमरावती परिसरात सापळा रचून मुख्य आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईमुळे नागरिकांमध्ये सुटकेचा श्वास सोडला गेला असून पोलिसांच्या या तत्परतेचे कौतुक होत आहे.



नेमकी घटना काय?

दिनांक १६ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजेच्या सुमारास, फिर्यादी रूपचंद चोखोबा कांबळे (वय ६८ वर्षे, रा. धामणगाव वाठोडा) हे हिंगणघाट येथील कृषी उत्पन्न बाजार समिती जवळ, नागपूर-हैदराबाद हायवे रोडवर उभे होते. यावेळी एक अनोळखी इसम पांढऱ्या रंगाच्या कारने त्यांच्या जवळ आला. त्याने फिर्यादीला “बावाजी इधर आओ मेरे गाडी मे बैठो, भी उधरीच दवाखाना के तरफ जा रहा हु आपको छोड दूंगा” असे आमिष दाखवून बळजबरीने आपल्या कारमध्ये बसवले.



यानंतर आरोपीने फिर्यादीला नागपूर-हैदराबाद रोडवरील वणी गावाजवळ नेले. तिथे त्यांना तोंडावर व डोळ्यावर बुक्क्यांनी मारहाण करून गंभीर जखमी केले. तसेच फिर्यादीचा मोबाईल फोन फोडून त्याचे नुकसान केले आणि जीवे मारण्याची धमकी देऊन ऑनलाईन माध्यमातून बळजबरीने २०,००० रुपये उकळले. याप्रकरणी हिंगणघाट पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांची धडक कारवाई आणि तपास

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वर्धा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल आणि अपर पोलीस अधीक्षक  सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेची विशेष पथके नागपूर व पुलगाव येथे रवाना करण्यात आली.



स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अत्यंत वेगाने तांत्रिक विश्लेषणाचा वापर करत गुन्ह्यातील रक्कम स्वीकारणाऱ्या इसमाचा नागपूर जिल्ह्यात शोध घेतला. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे मुख्य आरोपीचा माग काढण्यात आला. अमरावती जिल्ह्यातील देवगाव परिसरातून सुरेशसिंग बंगालसिंग चितोडीया (वय ४० वर्षे, रा. पाचोरा, जि. जळगाव) या आरोपीला शिताफीने ताब्यात घेण्यात आले.
पोलिसांनी कसून चौकशी केली असता आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेली ५ लाख रुपये किंमतीची पांढऱ्या रंगाची कार (क्र. एम.एच. १९ ई.ए. ३९८०), १०,००० रुपये किंमतीचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल आणि रोख १७,००० रुपये असा एकूण ५,२७,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस पथकाची कामगिरी

सदर यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या आदेशानुसार आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या तपासात पोलीस उपनिरीक्षक राहुल इटेकार, पोलीस हवालदार नरेंद्र पाराशर, रामेश्वर नागरे, अरविंद येणुरकर, मनोज धात्रक, महादेव सानप, पोलीस अंमलदार मिथुन जिचकार, प्रफुल पुनवटकर, सागर भोसले, हर्षल सोनटक्के (सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा) आणि सायबर सेलचे पो.हवा. अक्षय राऊत यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.









WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!