
हिंगणघाट अपहरण व खंडणी प्रकरण: २४ तासांत आरोपी जेरबंद

वर्धा:
हिंगणघाट पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या एका खळबळजनक अपहरण व खंडणी प्रकरणाचा वर्धा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या २४ तासांच्या आत यशस्वी उलगडा केला आहे. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी नागपूर, पुलगाव आणि अमरावती परिसरात सापळा रचून मुख्य आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईमुळे नागरिकांमध्ये सुटकेचा श्वास सोडला गेला असून पोलिसांच्या या तत्परतेचे कौतुक होत आहे.

दिनांक १६ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजेच्या सुमारास, फिर्यादी रूपचंद चोखोबा कांबळे (वय ६८ वर्षे, रा. धामणगाव वाठोडा) हे हिंगणघाट येथील कृषी उत्पन्न बाजार समिती जवळ, नागपूर-हैदराबाद हायवे रोडवर उभे होते. यावेळी एक अनोळखी इसम पांढऱ्या रंगाच्या कारने त्यांच्या जवळ आला. त्याने फिर्यादीला “बावाजी इधर आओ मेरे गाडी मे बैठो, भी उधरीच दवाखाना के तरफ जा रहा हु आपको छोड दूंगा” असे आमिष दाखवून बळजबरीने आपल्या कारमध्ये बसवले.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वर्धा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल आणि अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेची विशेष पथके नागपूर व पुलगाव येथे रवाना करण्यात आली.

सदर यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या आदेशानुसार आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या तपासात पोलीस उपनिरीक्षक राहुल इटेकार, पोलीस हवालदार नरेंद्र पाराशर, रामेश्वर नागरे, अरविंद येणुरकर, मनोज धात्रक, महादेव सानप, पोलीस अंमलदार मिथुन जिचकार, प्रफुल पुनवटकर, सागर भोसले, हर्षल सोनटक्के (सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा) आणि सायबर सेलचे पो.हवा. अक्षय राऊत यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.






