
कळमना पोलिसांची धडक कारवाई: घरफोडीचा उलगडा, सोन्याच्या दागिन्यांसह आरोपींना अटक
नागपूर (कळमना): कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घरफोडीच्या गुन्ह्याचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले असून आरोपींकडून चोरीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
दिनांक ०४ डिसेंबर २०२५ ते ०५ डिसेंबर २०२५ दरम्यान गुजराती कॉलनी, कळमना येथील रहिवासी राहुल भिमजीयानी हे आपल्या कुटुंबासह बाहेरगावी गेले होते. यादरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला व १,२९,८१९/- रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.

याप्रकरणी घरमालकाच्या तक्रारीवरून कळमना पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध कलम ३०५(अ), ३३१(३), ३३१(४) भा.न्या.सं. अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस कारवाई व आरोपींची अटक
गुन्ह्याचा तपास करत असताना कळमना पोलिसांच्या तपास पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे खालील आरोपींना निष्पन्न करून ताब्यात घेतले:

-
मुबारक वकीलबाबु शहा (वय २१ वर्षे, रा. कुंदनलाल गुप्ता नगर, बंडु किराणा जवळ, यशोधरानगर, नागपूर)
-
फैजान खान अजीम खान (वय २७ वर्षे, रा. राजीव गांधी नगर, यशोधरानगर, नागपूर)

चोरीच्या मालाची विक्री व जप्ती
आरोपी मुबारक शहा याची कसून चौकशी केली असता, त्याने चोरीतील आपल्या हिश्श्याचा माल आरोपी निकेश बलराज शाहू (वय २५ वर्षे) आणि सलमान खान ईकबाल खान (वय ३० वर्षे, रा. कुंदनलाल गुप्ता नगर, नुरी मस्जीद मागे, यशोधरानगर) यांच्यामार्फत आरोपी फैजान खान याला विकल्याचे कबूल केले.
तपासादरम्यान पोलीस पथकाने आरोपी फैजान खान याला छिंदवाडा (मध्य प्रदेश) येथून ताब्यात घेऊन अटक केली. त्याच्याकडून १,५०,०००/- रुपये किमतीचे १० ग्रॅम शुद्ध सोने जप्त करण्यात आले आहे. इतर पाहिजे असलेल्या आरोपींचा शोध आणि पुढील तपास सुरू आहे.

तपास पथक
ही यशस्वी कारवाई अपर पोलीस आयुक्त (दक्षिण प्रभाग) वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त नित्यानंद झा, सहाय्यक पोलीस आयुक्त (कळमना विभाग)रोहीत ओव्हाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण काळे, दुपोनि. करीम पठाण, पोउपनि. गजानन राऊत, पोहवा. प्रमोद गंगाले, विशाल बैसारे, पोअं. नितीन मिश्रा, ललीत शेंडे व अविनाश ग्वालवंशी यांनी या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली.




