
आर्वी पोलिसांची कारवाई :डमी मोबाईल देऊन फसवणूक करणारा गजाआड

डमी मोबाईल देऊन १० हजारांची फसवणूक करणारा गजाआड; आर्वी पोलिसांची धडक कारवाई
आर्वी (जि. वर्धा): शिवसैनिक असल्याचे सांगून आणि बहिणीच्या हत्येची खोटी बतावणी करून डमी मोबाईल गहाण ठेवत १० हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला आर्वी पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीकडून फसवणुकीची पूर्ण रक्कम हस्तगत केली असून, न्यायालयाच्या आदेशानुसार त्याची वर्धा मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.


नेमकी घटना काय घडली?
आर्वी येथील हनुमान वार्डात राहणारे दशरथ हंसराज जाधव (वय ७०) हे २७ जुलै २०२६ रोजी दुपारी ११:३० वाजेच्या सुमारास त्यांच्या कार्यालयात काम करत होते. त्यावेळी अमरावती पासिंगची एक चारचाकी गाडी त्यांच्या कार्यालयासमोर येऊन थांबली. त्या गाडीतून दोन व्यक्ती बाहेर आल्या आणि त्यांनी जाधव यांच्या कार्यालयात प्रवेश केला.

त्यांनी स्वतः शिवसैनिक असल्याचे सांगितले. त्यातील एकाने अत्यंत घाईत असल्याचे भासवत, “माझ्या बहिणीचा मर्डर झाला आहे आणि मला तातडीने जावे लागणार आहे. माझ्याकडे पैसे कमी पडत असून मला ११ हजार रुपयांची तातडीची गरज आहे,” अशी कहाणी रचली.

विश्वास संपादन करण्यासाठी त्याने महिनाभरापूर्वीच २६,९९९ रुपयांना खरेदी केलेला ‘Vivo Y400 PRO 5G’ (RAM 8, ROM 256, Battery 5500 mAh) मोबाईल आणि नागपूरच्या सीताबर्डी येथील ‘मॅजिक मोबाईल’ दुकानाचे बिल दाखवले. “हा मोबाईल दोन दिवसांसाठी तुमच्याकडे गहाण ठेवतो,” असे सांगून आरोपीने दशरथ जाधव यांच्याकडून ‘PhonePe’ द्वारे १० हजार रुपये ऑनलाईन वर्ग करून घेतले आणि तेथून पसार झाला.
असा उघडकीस आला प्रकार
दोन दिवस उलटूनही संबंधित व्यक्ती मोबाईल नेण्यासाठी किंवा पैसे परत करण्यासाठी आला नाही. त्यामुळे जाधव यांना संशय आला. त्यांनी गहाण ठेवलेला मोबाईल बारकाईने तपासला असता तो खरा मोबाईल नसून केवळ दाखवण्यासाठीचा ‘डमी मोबाईल’ असल्याचे स्पष्ट झाले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तात्काळ आर्वी पोलीस ठाण्यात धाव घेतली.

गुन्हा दाखल व आरोपीस अटक
फिर्यादी दशरथ जाधव यांच्या तक्रारीवरून आर्वी पोलीस ठाण्यात अपराध अन्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस निरीक्षक सतीश डेहनकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक (सपोनि) मल्हारी ताळीकोटे व पोलीस अंमलदार बाबासाहेब गवळी यांनी प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला. तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपी दिलीप लक्ष्मण मोहिते याला शिताफीने ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. आरोपीकडून फसवणूक केलेली रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे.

पोलीस पथक
सदर यशस्वी कारवाई वर्धा जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी (पुलगाव) डॉ. वंदना कारखेले यांच्या मार्गदर्शनाखाली आर्वीचे पोलीस निरीक्षक सतीश डेहनकर, सपोनि मल्हारी ताळीकोटे आणि पोलीस अंमलदार बाबासाहेब गवळी यांनी केली.
- पोलीस प्रशासन तर्फे नागरिकांना आवाहन:
“मदतीच्या नावाखाली किंवा अडचणीचे कारण सांगून कोणीही मोबाईल अथवा मौल्यवान वस्तू गहाण ठेवून पैशांची मागणी करत असल्यास, त्या व्यक्तीची व वस्तूची पूर्ण खात्री केल्याशिवाय पैसे देऊ नका. असा कोणताही संशयास्पद प्रकार घडल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.”



