हिंगणघाटमधील एनडीपीएस गुन्ह्यातील वाँटेड आरोपी नागपुरात अटकेत; खुनासह जबरी चोरीचे गंभीर गुन्हे दाखल

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow


हिंगणघाट येथील एनडीपीएस गुन्ह्यातील पाहिजे असलेला सराईत आरोपी नागपुरात जेरबंद; खुनासह जबरी चोरीचे गुन्हे दाखल

 वर्धा:

जिल्हा वर्धा येथील हिंगणघाट पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एनडीपीएस (NDPS) कायद्यांतर्गत गुन्ह्यात पाहिजे असलेला आणि खुनासारख्या गंभीर गुन्ह्यांचा रेकॉर्ड असलेला सराईत आरोपी हर्षल विनोद गिमेकर याला गुन्हे शाखा युनिट क्र. ६ च्या पथकाने नागपुरातून अटक केली आहे.



कारवाईची पार्श्वभूमी:

दिनांक ३०.१०.२०२६ रोजी रात्रीच्या गस्तीदरम्यान गुन्हे शाखा युनिट क्र. ६ च्या अधिकारी व अंमलदारांना खात्रीशीर माहिती मिळाली की, हिंगणघाट येथील अंमली पदार्थाच्या गुन्ह्यातील पाहिजे असलेला आरोपी हर्षल गिमेकर हा नागपूर शहरातील बेसा, मानेवाडा रोड परिसरात फिरत आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ त्या परिसरात शोध घेतला.



वर्णनानुसार एक इसम पोलिसांना दिसून आला, जो पोलिसांना पाहताच पळून जाऊ लागला. पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. विचारपूस केली असता त्याने आपले नाव हर्षल विनोद गिमेकर (वय २४ वर्ष, रा. संत गोमाजी वार्ड, हिंगणघाट, जि. वर्धा) असल्याचे सांगितले.



गुन्हेगारी पार्श्वभूमी:

आरोपीचा गुन्हे अभिलेख तपासला असता, तो हिंगणघाट पोलीस ठाण्यातील एनडीपीएस गुन्ह्यातील वाँटेड आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. तसेच त्याच्यावर पो.ठाणे हिंगणघाट येथे खून आणि जबरी चोरी यांसारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. आरोपीला पुढील कार्यवाहीसाठी स्थानिक गुन्हे शाखा, हिंगणघाट, जि. वर्धा यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

पोलीस पथकाची कामगिरी:

सदरची यशस्वी कामगिरी  विश्वास नांगरे पाटील (पोलीस आयुक्त, नागपूर शहर), नविनचंद्र रेड्डी (सह. पोलीस आयुक्त, नागपूर शहर),  राजेंद्र दाभाडे (अपर पोलीस आयुक्त – गुन्हे, नागपूर शहर),  दीपक अग्रवाल (पोलीस उप आयुक्त – डिटेक्शन) आणि वैभव जाधव (सहा. पोलीस आयुक्त – गुन्हे शाखा) यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. श्री. भरत कऱ्हाडे, सपोनि. सचिन गायकवाड, पोउपनि. राहुल रोटे, सफौ. मुकेश खांडरे, पोहवा नारायण पारवेकर, चंद्रशेखर भारती, पोअं. दिनेश महल्ले, सुनिलकुमार यादव, लक्ष्मीकांत सोनटक्के व राहुल पाटील यांनी केली आहे.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!