
नागपूर: सीताबर्डीतील पॅथॉलॉजी लॅबमधून १०,५०० रुपयांची चोरी करणारी सराईत महिला आरोपी अटकेत

नागपूर: सीताबर्डी पोलिसांची धडक कारवाई; लॅबमधून १०,५०० रुपयांची चोरी करणाऱ्या सराईत महिला आरोपीला अटक!
नागपूर:

सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या चोरीच्या एका गुन्ह्याचा पर्दाफाश करत पोलिसांनी एका सराईत महिला आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. लॅबमध्ये येऊन कर्मचाऱ्याची नजर चूकवून रोकड लांबवणाऱ्या या महिला चोराला पोलिसांनी तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे जेरबंद केले आहे.

फिर्यादी अविनाश कृष्णराव कडक (वय ५० वर्ष, रा. इंदिरा नगर, जाटरोड गल्ली क्र. १, पोलीस चौकीजवळ, नागपूर) यांनी सीताबर्डी पोलीस ठाण्यात येऊन तक्रार नोंदवली होती. ते सीताबर्डी पोलीस ठाणे हद्दीतील ‘पुष्पकुंज अपार्टमेन्ट’, हॉटेल सेंटर पॉईंटच्या बाजूला, येस बँकेखाली असलेल्या ‘आस पॅथॉलॉजी लॅबोरेटरी’ येथे काम करत होते.

दिनांक ०९.१०.२०२६ रोजी दुपारी १५:४० वाजेच्या सुमारास, एका अज्ञात महिलेने लॅबमध्ये प्रवेश केला. फिर्यादीची नजर चुकून तिने काऊंटरमधील १०,५००/- रुपये रोकड लांबवली व तिथून पसार झाली. या तक्रारीवरून सीताबर्डी पोलीस ठाण्यात कलम ३०३(२) भारतीय न्याय संहितेनुसार (BNS) गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांची कारवाई व तपास:
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या तपास पथकातील अधिकारी व अंमलदारांनी तांत्रिक तपास केला. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, अनिता नामदेव चौधरी (वय ३९ वर्ष, रा. रेल्वे क्वार्टर ग्राउंड बाजूला, गुलमोहर बारसमोर, सीताबर्डी, नागपूर) या महिला आरोपीला मोरभवन परिसरात संशयितरीत्या वावरताना ताब्यात घेण्यात आले.

पोलिसांनी कसून चौकशी केली असता, तिने लॅबमध्ये चोरी केल्याची कबुली दिली. आरोपीच्या ताब्यातून चोरी केलेल्या रकमेपैकी १,१००/- रुपये जप्त करण्यात आले आहेत. तिचे गुन्हे अभिलेख (Criminal Record) तपासले असता, तिच्याविरोधात विविध पोलीस ठाण्यांमध्ये चोरीचे अनेक गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले असून ती एक सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी तिला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
मार्गदर्शक व तपास पथक:
सदर उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त नागपूर शहर विश्वास नांगरे पाटील, सह. पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अपर पोलीस आयुक्त (उत्तर विभाग) नागपूर शहर श्रीमती विनीता शाहू, पोलीस उपायुक्त (परि.क्र. २) श्रीमती अन्नपूर्णा सिंग, आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (सीताबर्डी विभाग) सुनीलसिंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

या कारवाईत वपोनि. सुहास राऊत, पोउपनि. विनोद तिवारी, पोहवा. उमेश कसलीकर, पोअं. सैयद वाहीद व मपोअं. अनिता वरखेडे यांनी सहभाग घेतला होता.



