
डव्वा जिओ टॉवर केबल चोरीचा पर्दाफाश; २० हजारांच्या मुद्देमालासह एकाला अटक

डव्वा येथील जिओ टॉवर केबल चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; २० हजारांच्या मुद्देमालासह एकाला अटक
गोंदिया (प्रतिनिधी): सडक अर्जुनी तालुक्यातील डव्वा येथील रिलायन्स जिओ कंपनीच्या मोबाइल टॉवरमधून महागडी कॉपर केबल चोरी करणाऱ्या आरोपीला गोंदिया स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने अटक केली आहे. तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदाराच्या मदतीने पोलिसांनी ही धडाकेबाज कारवाई करत आरोपीकडून चोरीला गेलेली २० हजार रुपये किमतीची कॉपर केबल हस्तगत केली आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, २९ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ३:३० ते रात्री ८:०० वाजेच्या सुमारास मौजा डव्वा येथील रिलायन्स जिओ कंपनीच्या मोबाइल टॉवरमधून सुमारे २० फूट लांबीची २-कोर कॉपर पॉवर केबल (किंमत अंदाजे २०,००० रुपये) अज्ञात चोरट्याने लंपास केली होती. याप्रकरणी फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून डुग्गीपार पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तांत्रिक तपास आणि पोलिसांची कारवाई
मोबाइल टॉवरमधील साहित्याच्या चोरीचे वाढते प्रमाण आणि गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक गोरख भामरे व अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांनी या गुन्ह्याचा छडा लावण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक डुग्गीपार पोलीस ठाणे हद्दीत समांतर तपास करत होते.

२४ नोव्हेंबर २०२६ रोजी तपास पथकाला तांत्रिक माहिती आणि गोपनीय खबऱ्यामार्फत ही चोरी मौजा डव्वा (ता. सडक अर्जुनी) येथील रहिवासी सुरेंद्र चौधरी याने केल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. पोलिसांनी तात्काळ सापळा रचून डव्वा येथून सुरेंद्र चौधरी याला ताब्यात घेतले.
पलंगाखाली लपवून ठेवला होता मुद्देमाल:

पोलिसी खाक्या दाखवताच आरोपी सुरेंद्र चौधरी याने २९ सप्टेंबर रोजी दुपारी डव्वा येथील जिओ टॉवरमधून केबल चोरल्याची कबुली दिली. चोरलेली केबल त्याने आपल्या घरातच लपवून ठेवल्याचे सांगितले. पोलिसांनी पंचासमक्ष त्याच्या घराची झडती घेतली असता, पलंगाखाली लपवून ठेवलेले काळ्या रंगाचे २-कोर कॉपर पॉवर केबलचे २ नग (एकूण किंमत २०,००० रुपये) जप्त केले. या प्रकरणाचा पुढील तपास डुग्गीपार पोलीस करत आहेत.
या पथकाने केली कारवाई:
ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या निर्देशाखाली आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिषेक जंगमवार, पोलीस हवालदार दुर्गेश तिवारी, तुळशीदास लुटे, पोलीस शिपाई सुनील डहाके, राकेश इंदूरकर, निखिल मेश्राम आणि चालक पोलीस शिपाई निलेश ठाकरे यांच्या पथकाने केली.


